उपसचिवांचे आदेश : पुराम व रहांगडाले यांचे प्रयत्नदेवरी : गोंदिया व भंडारा जिल्ह्यात आधारभूत किमतीनुसार खरीप पणन हंगाम २०१४-१५ मध्ये खरेदी केलेल्या धानावर केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरीक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २५० रुपये प्रोत्साहन राशी (बोनस) शासनाने मंजुर केली. मात्र अद्याप त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. त्यामुळे आमगाव-देवरीचे आमदार संजय पुराम आणि तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार वित्तीय सल्लागार व उपसचिव सतीश सुपे यांनी ती रक्कम त्वरीत अदा करण्याची कारवाई करावी असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला दिले आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पणन हंगाम २०१४-१५ मध्ये मार्केटिग फेडरेशनमार्फत १७ लाख ५६९.१६ क्विंटल धान आणि आदिवासी विकास महामंडळमार्फत १२ लाख ६७ हजार ७६५.७२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. दोन्ही अभिकर्ता संस्थांमार्फत एकूण २९ लाख ६८ हजार ३३४.८८ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. या धानावर २५० रुपये प्रतिक्विंटल प्रोत्साहन राशी (बोनस) प्रमाणे एकूण ७४ कोटी २० लाख ८३ हजार ७२० रुपये एवढी रक्कम आपल्या अधिनस्त प्रपंची लेखातून तत्काळ अदा करण्याची कारवाई करावी, असे निर्देश उपसचिव सतीश सुपे यांनी दिले आहे. सदर प्रोत्साहन राशी शेतकऱ्यांना त्वरित मिळावे याकरिता आ.संजय पुराम आणि आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याने त्यांना यश आले आहे. त्यामुळे लवकरच हे पैसे मिळण्याची आशा आहे. (प्रतिनिधी)
धानाची प्रोत्साहन राशी मिळण्याचा मार्ग मोकळा
By admin | Updated: August 6, 2015 00:53 IST