गोंदिया : बालाघाटकडून गोंदियाकडे चारचाकी वाहनातून आणला जात असलेला सव्वा सहा लाखांचा सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रामनगर पोलिसांच्या डी.बी.पथकाने बुधवारी (दि.१५) रात्री ८:३० वाजताच्या बालाघाट टी-पाइंटवर केली. पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमोडे हे बुधवारी रात्री पथकासह पेट्रोलिंग करीत होते. सुगंधित तंबाखू घेऊन चारचाकी वाहन बालाघाटकडून गोंदियाकडे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिस पथकाने येथील बालाघाट टी-पाइंटवर पाळत ठेवली. बालाघाटकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली. बालाघाटकडून आलेल्या एमएच ३५/ ए.जे.२६१३ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, पथकाला या वाहनात सुगंधित तंबाखूच्या जवळपास दहा पिशव्या आढळल्या. वाहन चालक बालाजी लक्ष्मीनारायण नायडू (रा. छोटा गोंदिया) याची अधिक चाैकशी केल्यावर त्यात सव्वा सहा लाखांचा हा तंबाखू गोंदियाला आणला जात असल्याचे पुढे आले. पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून, सुगंधित तंबाखूसह वाहन जप्त केले आहे.यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर, रामनगरचे पोलिस निरीक्षक बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमोडे, सहायक फाैजदार भुरे, पोलिस हवालदार चव्हाण, पोलिस हवालदार भगत, पोलिस शिपाई नागपुरे, कांबळे, फेंडर यांनी केली.
अन्न औषध प्रशासन विभागाच्या कारवाईनंतर गुन्हा
पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर अन्न औषध प्रशासन विभागाच्यावतीने जोपर्यंत अधिकृत कारवाईची प्रकिया होत नाही,तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. ही घटना बुधवारच्या रात्रीची असून गुरुवारच्या रात्री उशीरापर्यंत अन्न औषध प्रशासन विभागाने काय कारवाई केली हे कळू शकले नाही.