संतोष बुकावन - अर्जुनी/मोर.इटियाडोह धरणाचे पाणी गाढवी नदीत उतरल्याने ती फुगते व बोरी/महागाव या गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त होते. गावकऱ्यांचे जीव धोक्यात येते. अशा संकटसमयी गावाबाहेर निघायला मार्ग नसल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडते. मातब्बर लोकांचे दर्शन होणारे हे गाव मात्र लोकप्रतिनिधींच्या कानाडोळा प्रवृत्तीमुळे जोखीमेचे जीवन जगत आहे. आ. राजकुमार बडोले यांच्या दत्तक ग्राम योजनेतील बोरी हे एक गाव आहे. या गावात मातब्बर राजकीय मंडळी आहे. मात्र हे शापित गाव म्हणावे लागेल. राजकीय मंडळीची इच्छाशक्ती नसल्याने या गावाचा विकास खुंटला आहे. आमदारांनी गाव दत्तक घेतले. येथे विदारक समस्या आहेत. याची जाणीव जिल्हाधिकाऱ्यांपासून माजी केंद्रीय मंत्र्यापर्यंत आहे. मात्र आजतागायत कुणीही या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत हे वास्तव आहे. गतवर्षी येथे महापूर आला. गावाला पुराच्या पाण्याने चहूकडे वेढा घातल्याने गावकरी गावातच अडकले होते. प्रशासनाने बरेच परिश्रम घेऊन गावकऱ्यांना गावाबाहर काढले मंत्री, विरोधी पक्ष नेते, जिल्हाधिकारी साऱ्यांनी बोरी गावाला भेट दिली. येथील संपूर्ण शेती पाण्याखाली आली मात्र या समस्येवर अद्यापही तोडगा काढण्यात आला नाही ही शोकांतिका आहे. महागावकडून बोरी गावाकडे जाणाऱ्या इटियाडोह धरणाच्या उपकालव्याची तीन फुट उंची वाढविल्यास पूरपरिस्थीती या गावच्या लोकांना बाहेर निघण्यासाठी पर्यायी व्यवस्था होऊ शकते. पाळ उंच केल्याने नदी-नाल्यांचे पाणी गावात शिवणार नाही याशिवाय मांडोखाल नाल्यावर पूल होणे आवश्यक आहे. मात्र यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मागणीसाठी गावातील नेतेमंडळींनी जिल्हाधिकारी अमित सैनी यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेरील खर्च असल्याने त्यांनी हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला. हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. पूर परिस्थीती निवळल्याबरोबर सारी नेतेमंडळी या समस्येला विसरली. ७ कि.मी.पर्यंत पुनर्वसन करावे अशी मागणी ३० आॅगस्ट २ढ१३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. हा प्रस्ताव अद्यापही मंजूर करण्यात आला नाही. या गावची लोकसंख्या १६०० आहे. तशा या गावात समस्या भरपूर आहेत. इतर दत्तक गावात आमदार भेटी देत नसले तरीया गावावर त्यांचे अधिक प्रेम आहे. त्यांनी येथे अनेकवेळा भेटी दिल्या. जेव्हा बोलावले तेव्हा ते या गावात येतात. समस्या डायरीवर लिहून घेतात. मात्र समस्या सुटत नाही. स्थानिक नेते प्रयत्न करून जी विकासकामे करतात. त्यामुळे थोडाफार या गावाचा विकास झाला आहे. या गावात पूरपरिस्थीतीत आठवडाभर विद्युत पुरवठा खंडित असतो. पुराच्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात येते. गतवर्षी पूर असतांना एका महिलेची गावातील उपकेंद्रातच प्रसूती करण्यात आली होती. या ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या आसोली येथील आंगणवाडीची इमारत गतवर्षी तयार झाली ती गळते. याठिकाणी नवीन इमारत किंवा डागडूजीसाठी निधी आवश्यक आहे. आ. राजकुमार बडोले यांनी आपल्या निधीतून गावासाठी एक रुपयासुध्दा दिलेला नाही. बौध्द स्मारकाचे बांधकाम, रमाबाई चौकाचे सौंदर्यीकरण व सरंक्षणभिंत, बोरी, सावरी व आसोली येथील गाव अंतर्गंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण, गुरूदेव प्रार्थना मंदिराचे बांधकाम, रैय्यतवाडी रस्त्याचे खडीकरण, विजय रामटेके यांचे शेतापासून ते जानवा पायवाटेपर्यंत ३ किमी रस्त्याचे खडीकरण, गाढवी नदीवर मोठा बंधारा, नाल्यावर बंधारा बांधकाम या समस्या आ. बडोले यांच्या दत्तक ग्राम योजनेतील आहेत.मात्र अद्यापही त्यांचे निराकरण झालेले नाही.गाढवी नदीवर मोठ्या बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यास बऱ्याच अंशी शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध होऊ शकते.
धरणाच्या पाण्यामुळे बेटाचे स्वरूप
By admin | Updated: July 17, 2014 00:10 IST