वनविभागाची कारवाई : २ ट्रॅक्टर जप्त, १२ लोकांवर गुन्हाबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या माहुरकूडा, महागाव बीटमधील संरक्षित वनामध्ये अवैधपणे मुरुम खोदकाम करुन ट्रॅक्टरने वाहतूक करणाऱ्या १२ लोकांना मुद्देमालासह पकडून वनविभागाने ताब्यात घेतल्याची घटना मंगळवारी (ता.३०) सायंकाळी घडली.याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० आॅगस्ट रोजी सकाळच्या वेळी सहवनक्षेत्र महागावअंतर्गत माहुरकूडा बिटमधील संरक्षित वन १०७३ मध्ये अवैधपणे मुरुम खोदकाम करुन ट्रॅक्टरमध्ये भरुन वाहतूक करीत असताना वनविभागाच्या पथकानी पकडले. यात क्रमांक नसलेला ट्रॅक्टर व ट्राली (एमएच ३५ एफ ४३५१) तसेच दुधराम मजैराम लंजे (सिरोली), गिरीधर यशराम वघारे, प्रमोद महादेव कोल्हे, महावीर चैतराम पुराम, मुकेश तुळशीराम सोनवाने, सकील वसीर शेख यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३३ (१) ब, ४१,५२ व ४२ अन्वये वनगुन्हा नोंदवून ट्रॅक्टर, ट्रॉली, फावडा, टिकास, घमेल हे साहित्य जप्त करण्यात आले.दुसऱ्या कारवाईत महागाव बिटातील संरक्षित वन १०७२ मध्ये मुरुम भरलेला ट्रॅक्टर ट्रालीसह पकडण्यात आला. ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ एल ८५२२ ट्रॉली क्रमांक एमएच ३५ एफ ४८६१ महिंद्रा भूमिपूत्र कंपनीचा जप्त करुन सुनील भाऊराव डोंगरवार (महागाव), सुनील करणसिंह पवार (सिरोली), मनोहर ईश्वर देशमुख (महागाव), विठ्ठल तुळशीराम पवनकर (महागाव), रतन जयपाल शेंडे, दालचंद बाबुराव नेवारे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३३ (१),ब, ४१, ५२ व ४२ अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला. ट्रॅक्टर, ट्रॉलीसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. सदर धडक कारवाई जिल्हा उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उववनसंरक्षक राहूल पाटील यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले, क्षेत्र सहायक सी.के.दास, वनरक्षक पी.के. ब्राम्हणकर, एस.यू. चव्हान, पी.एम. केळवतकर, पी.के. लाडे, व्ही.जी. राऊत यांच्या पथकानी केली. (वार्ताहर)
जंगलात मुरुम खोदणारे ताब्यात
By admin | Updated: September 2, 2016 01:46 IST