गर्भवतींना आवाहन : अतिजोखमीचे बाळंतपण टाळण्यासाठी मार्गदर्शन गोंदिया : सुरक्षित मातृत्वाची हमी घ्यायची असेल तर गर्भवतींनी ९ महिने मातृत्वाची सप्तपदी पाळलीच पाहिजे. याशिवाय वेळेवर लसीकरण, लोहयुक्त गोळ्यांचा प्रतिबंधक डोज, संतुलित आहार व वैद्यकीय तपासण्या वेळोवेळी करुन घ्याव्या, असे आवाहन प्रसुतीतज्ज्ञ व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ.सायस केंद्रे यांनी केले. स्थानिक बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालय येथे रविवारी गर्भवतींची मोफत आरोग्य तपासणी शिबिर व जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचे उद्घाटन डॉ.केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून डॉ.सुवर्णा हुबेकर, परिचर्या अधिकारी डॉ. शिल्पा बघेले, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे आकाशानंद देशमुख, मेट्रन अरुणा मेश्राम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मेट्रन अरुणा मेश्राम यांनी सुरक्षित मातृत्वाबाबत विस्तृतपणे सांगितले. डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी प्रत्येक गर्भवतींनी १२ आठवड्यांच्या आत नोंदणी करावी, बाळंतपण दवाखान्यातच करावे. रक्त तपासण्या व वैद्यकीय तपासण्या नियमितपणे करुन घ्याव्या म्हणजे अतिजोखमीचे बाळंतपण येणार नाही, असे आवाहन केले. राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध मातृत्व आरोग्य सुरक्षा योजनेबाबत आकाशानंद देशमुख यांनी माहिती दिली. याप्रसंगी गर्भवतींसाठी गर्भसंस्कार माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. सुरक्षीत मातृत्व व बालजिवित्व हमी याबद्दल सचित्र माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन तेजस्विनी किरणापुरे यांनी तर आभार डॉ.अर्चना चव्हान यांनी मानले. कार्यक्रमाला गर्भवती, स्तनदा माता, बालके व रुग्णाचे नातेवाईक व स्टाफ उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
सुरक्षित मातृत्वाची सप्तपदी पाळा
By admin | Updated: July 15, 2016 02:45 IST