केवळ सहा तडीपार : सण, उत्सवात शांतता कायम ठेवण्याचे आव्हानगोंदिया : सण, उत्सव शांततेत पार पाडता यावे, या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी गुन्हेगारी जगतात सक्रिय असणाऱ्यांना तडीपार केले जाते. त्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस विभागाकडून सादर केला जातो. गेल्या ५ वर्षात जिल्ह्यातील अशा ५६ गुन्हेगारांना तडीपार करण्याचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र त्यावर कोणताही निर्णय न घेता ते प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्ष-दिड वर्षात जिल्ह्यात उफाळलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवताना पोलीस विभागावर चांगलाच ताण येत आहे.ज्या गुन्हेगारांवर मालमत्तेचे नुकसान किंवा शारीरिक इजा करण्यासंदर्भातील ३-४ किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असतील अशा गुन्हेगारांना गृहजिल्ह्यातून किंवा एकाच वेळी तीन-चार जिल्ह्यातून तडीपार केले जाते. त्या गुन्हेगारांमुळे जिल्ह्याची शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाकडून प्रत्येक महिन्याला गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई करावी, यासंदर्भातील प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविले जातात. त्या गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्याची गंभीरता पाहून पुढे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस विभाग सादर करीत असते. मात्र त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार उपविभागीय दंडाधिकारी (एसडीओ) यांना आहे.सन २०११ पासून आतापर्यंत तडीपारचे ५६ प्रस्ताव जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे आले आहेत. यापूर्वी अनेकांना तडीपार करण्यात आले, परंतु त्यांचा कालावधी संपल्याने ते पुन्हा जिल्ह्यात आले आहेत. परंतु ज्या गुन्हेगारांना तडीपार करायचे आहेत असे ५६ प्रस्ताव प्रलंबितच आहेत. यावर्षीच्या आठ महिन्यांत २४ आरोपींच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. परंतु हे प्रस्ताव निकाली काढण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत केवळ सहा आरोपी जिल्ह्यातून तडीपार आहेत. (तालुका प्रतिनिधी)शहरातील गुन्हेगारांचा सर्वाधिक समावेशमालमत्ता व शारीरिक इजा करण्याच्या गुन्ह्यातील आरोपींची सर्वाधिक संख्या गोंदिया शहरात आहे. शहर ठाणे व रामनगर ठाण्याच्या हद्दीत संघटीत गुन्हेगारीही सक्रिय असल्याने तडीपार होणारे सर्वाधिक आरोपी शहरातील आहे. त्यानंतर रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आरोपींचा क्रमांक लागतो. गोंदिया शहराच्या शांततेसाठी तडीपारीचे प्रस्ताव दर महिन्याला सादर केले जात आहेत.गँगवॉरनंतरही प्रशासनाची नरमाईची भूमिकागेल्या दिड-दोन वर्षात जिल्ह्यात गोंदिया शहरात गँगवॉर उफाळले आहे. यातून काही हत्या आणि प्राणघातक हल्ले झाले आहेत. यातूनच अनेक वेळा शहरातील शांततामय परिस्थिती धोक्यात आली. मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून तडीपारीच्या प्रस्तावांवर निर्णय घेतला जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. आता किमान सण-उत्सवाच्या काळात तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा गोंदियावासीय करीत आहेत.
पाच वर्षांत ५६ लोकांच्या तडीपारीचे प्रस्ताव प्रलंबित
By admin | Updated: September 4, 2016 00:10 IST