गोंदिया : वर्गातील विद्यार्थिनीला अभ्यासासंदर्भात अधिक माहिती देण्याच्या नावावर आपल्या खोलीवर बोलाविणाऱ्या शिक्षकाने तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने त्या आरोपी शिक्षकाला पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे.प्राप्त माहितीनुसार, गोंदिया तालुक्याच्या अदासी येथील स्व. पोहुमल हायस्कूल येथे कार्यरत शिक्षक शामराव सुदाम नेताम (२८) रा. बोंडे ता.देवरी हा पोहुमल शाळेत मराठी व भूगोल या विषयाचा शिक्षक होता. तो वर्गात विषय न शिकविता मुलामुलींना मुले कसे होतात याचे लैंगिक शिक्षण देत होता. त्याने दागोटोला येथील एका १४ वर्षाच्या मुलीला २४ डिसेंबर २०१३ रोजी शाळा सुटल्यानंतर आपल्या खोलीवर अभ्यासासाठी एकटीच ये म्हणून बोलावले. ती त्याच्या खोलीवर गेली असता त्याने तिचा विनयभंग केला. यावेळी ती घाबरली. याबाबत कुणाला माहिती देऊ नकोस अन्यथा तुला नापास करील अशी धमकी दिली. धास्तावलेल्या त्या मुलीने पहिल्या दिवशी या घटनेची माहिती कुणाला सांगितली नाही. दुसऱ्या दिवशी तिने आपल्या मैत्रीणीला सांगितले. त्यानंतर आपल्या मोठ्या बहिणीला सांगितले. या घटनेची माहिती पिडीत मुलीच्या वडीलांना होताच त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिका व संस्था संचालक यांना सदर घटनेची माहिती देत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेनंतर १० फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी १०.३० वाजतादरम्यान ती एकटीच सायकलने जात असताना तिला रस्त्यात पकडून तिला धमकी दिली. गोंदिया ग्रामीण पोलिसात आरोपी शामराव नेताम याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३५४ अ, ३४१, ५०६, सहकलम बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमरीश देशमुख यांनी केला होता. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून जबाबदारी अॅण्ड. शबाना अंसारी यांनी सांभाळली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी महेश महाले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काम केले. (तालुका प्रतिनिधी)दंडाची रक्कम पीडित मुलीलाप्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अस्मार यांनी सुनावणी केली. बाल लैंगिक अत्यार अधिनियम कलम ८ अंतर्गत पाच वर्षाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड सुनावला. दंड न भरल्यास ६ महिन्याची शिक्षा, कलम १२ अंतर्गत पाच वर्षाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड सुनावला. दंड न भरल्यास ६ महिन्याची शिक्षा, कलम ३५४ अ(१) अंतर्गत दोन वर्षाची शिक्षा व एक हजार रूपये दंड सुनावला. दंड न भरल्यास २ महिन्याची शिक्षा, कलम ३५४ अ (४) अंतर्गत सहा महिन्याची शिक्षा व ७०० रूपये दंड सुनावला. दंड न भरल्यास १५ दिवसाची शिक्षा, कलम ५०६ अंतर्गत दोन वर्षाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड सुनावला. दंड न भरल्यास १० दिवसाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील १२ हजार ५०० रूपये दंडाची रक्कम पिडीत मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पाच वर्षाची शिक्षा
By admin | Updated: April 2, 2015 01:10 IST