गोंदिया : संपूर्ण देशभरात १६ जानेवारीला कोविड लॉचिंग लसीकरणांतर्गत फ्रंट लाईन कोरोना योद्ध्यांचे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून शुक्रवारी (दि.१४) सकाळी १० हजार ३०० कोविड लस जिल्ह्याला प्राप्त होणार आहे. या लस ठेवण्यासाठी गंगाबाई महिला रुग्णालयातील कोल्ड स्टोअरेजमध्ये व्यवस्था करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात संपूर्ण नोंदणी केलेल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयाचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी कोव्हिन ॲपवर करण्यात आली. या ॲपवर एकूण ८५०० डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लसीकरणाच्या एक दिवस आधी त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठविला जाणार आहे. यानंतर त्यांना बूथवर लसीकरणासाठी ओळखपत्र आणि आधारकार्ड घेऊन उपस्थित रहावे लागणार आहे. या सर्व कागदपत्रांची तपासणी करूनच लसीकरण केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण सहा केंद्र राहणार असून त्यात पाच जणांचे एक पथक कार्यरत राहणार आहे. लसीकरणा दरम्यान कुठलीही अडचण जाऊ नये यासाठी दोन तीनदा ड्राय रनसुध्दा घेण्यात आला आहे.
.......
१८०० लस अधिक उपलब्ध
जिल्ह्यात एकूण ८५०० फ्रंट लाईन कोरोना योध्दा असून त्यांचेच पहिल्या टप्प्यात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी १० हजार ३०० लस उपलब्ध करुन देण्यात आले. यासंदर्भातील पत्र सुध्दा जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहे. १६ जानेवारीला प्रत्येक केंद्रावर एकूण १०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
.......
कोट
१६ जानेवारीला कोविड लसीकरणासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. गुरुवारी एकूण १० हजार ३०० लस जिल्ह्याला प्राप्त होणार असून त्यानंतर सर्व कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवल्या जातील. लसीकरण मोहिमेदरम्यान कुठलीही अडचण जाऊ नये यासाठी गुरुवारी पुन्हा एकदा लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पडेल.
- दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी गोंदिया.
...............
जिल्ह्यातील एकूण फ्रंट लाईन योध्दा : ८५००
पहिल्या टप्प्यात दिला जाणार डोज : ८५००
एकूण उपलब्ध होणार लस : १० हजार ३००
जिल्ह्यातील एकूण लसीकरण केंद्र : ६