बोंडगावदेवी : गावकऱ्यांना आपली अप्रतिम कला दाखवून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणाऱ्या छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील एका कलावंताचा स्थानिक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुळशीदास बोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोनू कांत असे त्या कलावंताचे नाव असून आपल्या एका सोबत्यासह मागील पाच दिवसांपासून जीवघेणी कला सादर करून गावकऱ्यांना मनोरंजनाबरोबरच व्यसनमुक्त होण्याचे आवाहन करतो. ग्रामपंचायत समाजमंदिरात सोनू कांत यांनी सतत पाच दिवस नावीण्यपूर्ण कला प्रदर्शित केली. यात छातीवर मोठा दगड मांडून फोडणे, ट्युबलाईटचे रॉड अंगावर फोडणे, काचेच्या शिश्या डोक्यावर फोडणे, सायकलद्वारे रिंगण घालून तोंडाने खालची वस्तू वस्तू उचलने, देशभक्ती गीतावर नृत्य करणे, डोक्यावर आग लावून चहा तयार करणे व प्रेक्षकांना पिण्यासाठी देणे असे विविध प्रात्यक्षिक दाखवून प्रेक्षकांची वाहवा मिळवितात. तंटामुक्त समितीच्या वतीने सरपंच राधेश्याम झोळे, साधू मेश्राम, संदेश शहारे, पतीराम मेश्राम, गुड्डू मानकर, देविदास मेश्राम यांच्या उपस्थितीत तंमुसचे अध्यक्ष तुळशीदास बोरकर यांनी शाल व श्रीफळ देवून सत्कार करून निरोप देण्यात आला.
जीवघेणी कला दाखविणाऱ्याचा तंमुसने केला सत्कार
By admin | Updated: October 14, 2015 02:40 IST