भेसळयुक्त मिठाई : लिपिकाच्या भरोशावर कार्यालयगोंदिया : दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात मिष्ठान्नांची उलाढाल होते. या मिष्ठान्नांत भेसळयुक्त पदार्थांचा सर्रास वापर होत असल्याचे प्रकार गोंदियावासीयांना नवीन नाही. अशात येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. भंडारावरून येणाऱ्या एका कनिष्ठ लिपीकाच्या भरवश्यावरच कार्यालयाचा कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नागपूर येथे कार्यरत निरीक्षकांकडे सध्या गोंदियाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. अशात गोंदियावासीयांचे आरोग्य धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.अन्न व औषधांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. अशा प्रकारांची माहिती मिळाल्यास विभागाकडून कारवाई करून भेसळीचे प्रकार रोखले जातात. भेसळीचे हे प्रकार गोंदियातही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे खुद्द विभागानेच मध्यंतरी उघडकीस आणले आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी गेल्या दोन दिवसांपासून ऊत आला आहे. त्यामुळे मोठी मागणी असलेल्या मिष्ठान्नांत येथील काही विक्रेते भेसळयुक्त व शिळा खवा, पनिर, दूध व अन्य पदार्थांचा वापर करतात. विशेष म्हणजे हा प्रकार खुद्द विभागानेच मध्यंतरी कारवाया करून उघडकीस आणला होता. त्यानुसार यंदाही भेसळयुक्त पदार्थांपासून मिष्ठान्न तयार करण्यात येणार असल्याची शक्यता टाळता येणार नाही. मात्र असे असतानाही यंदा अन्न व औषध प्रशासनाकडून काहीच पाऊल उचलण्यात आले नसल्याचे दिसते. येथील कार्यालयात तर भंडारा येथून येणारे धनराज वनकर नामक कनिष्ठ लिपीक अख्या कार्यालयाचा कारभार चालवित असल्याचे दिसले. त्यातही आश्चर्याची आणखी एक बाब म्हणजे सध्या नागपूर येथे कार्यरत अन्न निरीक्षक उमप यांच्याकडे गोंदियाचा प्रभार देण्यात आला आहे. अशात त्यांना नागपूरचा कारभार बघून गोंदियाकडेही लक्ष द्यायचे आहे. एकंदर अन्न व औषध प्रशासनाचा कारभार हवेतच सुरू असल्याचे दिसते. विभागाकडे कर्मचारीच नसल्याने यंदा भेसळीच्या प्रकारांवर कारवाई कोण करणार असा प्रश्न येथे उपस्थित होतो. नेमकी हीच संधी साधून भेसळ करणारे व काही मिष्ठान्न तयार करणारे आपला हेतू साधून घेतील यात शंका नाही. (शहर प्रतिनिधी)
‘एफडीए’चा कारभार वाऱ्यावर
By admin | Updated: October 22, 2014 23:19 IST