शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात एकही कृषी केंद्रात युरिया खत मागील १५ ते २० दिवसांपासून उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर खतासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या धानपिकाला नत्र खताची नितांत आवश्यकता आहे. युरिया खताने धानावरील करपा व बेड्डीसारखे रोग कमी होतात. तसेच धानवाढीवर त्याचा चांगला परिणाम होतो. त्यामुळे हलक्या व भारी अशा दोन्ही जातीच्या धानाला त्याचा फायदा होऊन अधिक उत्पन्न प्राप्त होते. जिल्ह्यात युरियाचा साठा उपलब्ध असूनही कृत्रिम तुटवडा झाला असल्याने घाऊक विक्रेते अधिक दराच्या लालसेने युरियाचा साठा करून ठेवत असल्याची परिसरात चर्चा आहे. सद्यस्थितीत २८५ रुपये युरिया खताची बॅग ५०० रुपयापर्यंत विकत असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना विद्यमान आमदार व खासदार शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या रासायनिक युरिया खतासाठी झटताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भावना दुखावत आहेत. वेळ निघून गेल्यावर खत उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा काय? जिल्ह्यात कृषी विभागाकडून भरारी पथके तयार करण्यात आली. भरारी पथके साठेबाजांवर धाड न टाकता छोट्या-छोट्या कृषी केंद्रधारकांना वेठीस धरतात. परंतु त्या कृषी केंद्र धारकांकडे एकही युरिया खताची बॅग मिळत नसल्याचे दिसून येते. २०० मेट्रीक टन युरिया खताचा साठा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना खतासाठी वणवण फिरावे लागत आहे, हे विशेष. (वार्ताहर)
युरिया खतासाठी शेतकऱ्यांची वणवण
By admin | Updated: September 22, 2014 23:22 IST