मुंडिकोटा : पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशी तरी रोवणी केली.एवढे करून हाती काहीतरी येणार असल्याची आशा बाळगून असतानाच धानावर रोगराई लागल्याने शेतकरी मात्र हवालदील झाला आहे. निसर्गाने पुन्हा शेतकऱ्यांना झोडपून काढले असून डोळ्यांसमोर धान पीक खराब होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे. तिरोडा तालुक्यात शेती हाच मुख्य व्यवसाय असून मोठया प्रमाणात शेतकरी आजही पारंपारिक व्यवसायावरच निर्भर आहेत. यंदा मात्र पावसाने चांगलीच खेळी केली. मात्र कसे तरी शेतकऱ्याने घाम गाळून रोवणी करून धानाचे पीक घेतले. आता मात्र धान पिकावर मोठ्या प्रमाणात किडी व रोगराई लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता धान पीक निघूनही शेतकऱ्याला हाती काहीच लागणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पिकाला रोगराईपासून वाचविण्यासाठी शेतकरी किटकनाशकांचा वापर करीत आहे. मात्र त्यांचाही काहीच फायदा दिसत नसून कधी कोणती अळी व रोगराई हल्ला करणार याच भितीत शेतकरी वावरत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी कन्हान -कामठी वरून औषधी आणली, मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे शेतकरी बोलत आहेत. विशेष म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी १०१० धान लावले आहे. हे उच्च प्रतीचे धान असून कमी प्रमाणात घेतले आहे. या धानाला एका पावसाची गरज असतानाच निसर्गाने दगा दिला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्यांचे धान पीक उत्तम येणार असे दिसत आहे. तर ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यांचे मात्र काही खरे नाही. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे. जगाचे पोट भरत असताना मात्र त्यालाच दोन वेळचे जेवण कठीण होत आहे. अशा परिस्थितीत शेती करणे परवडणारे राहिलेले नाही. मात्र पारंपारिक व्यवसाय असल्याने करावाच लागत आहे. त्यात मात्र निसर्गानेच साथ दिल्यावर आता शेतकऱ्यांचा कैवारी कुणीच उरलेला नाही. त्यामुळे तो चिंताग्रस्त आहे. (वार्ताहर)
धान पिकावरील रोगराईने शेतकरी हवालदिल
By admin | Updated: October 18, 2015 02:07 IST