मोबदल्याची प्रतीक्षा : २० वर्षांपासून प्रशासनाकडून दुर्लक्षगोंदिया : तब्बल मागील २० वर्षापासून गोरेगाव तालुक्यातील घुमर्रा येथील भूमिहीन गरीब शेतकऱ्यांना अजूनही शेतीचा मोबदला मिळाला नसल्यामुळे येत्या १५ डिसेंबरनंतर गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.गोरेगाव तालुक्यातील घुमर्रा येथील ७३ शेतकऱ्यांना भूमिहीन करुन त्यांच्या सुपीक जमिनी हस्तांतरण केल्यानंतर सन १९९५-१६ मध्ये कलपाथरी मध्यम प्रकल्प म्हणून बांध बांधण्यात आला. शेती हस्तांतरण करताना शासनाच्या कर्मचाऱ्यांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत या सर्वांनी शेतकऱ्यांना तुम्ही आता भूमिहीन होत असल्यामुळे दोन किंवा तीन वर्षात तुम्हाला शेतीचा मोबदला दुप्पट भावाने राशी मिळेल असे सांगितले. एवढेच नाही तर कायमस्वरुपी शेती गेल्यामुळे तुमच्या परिवारातील प्रत्येकी एकाला शिक्षणानुसार शासकीय नोकरी पण मिळेल, अशी हमी देत मध्यम प्रकल्प बांधाची पाळ बांधण्यासाठी सुपिक शेती हस्तांतरण केली. पण शासकीय नोकरी तर मिळाली नाहीच, परंतु मोबदला राशीही पुरेशी मिळाली नाही. टप्प्याटप्प्याने मिळालेला मोबदला सुपीक जमिनीऐवजी पडीत शेतीच्या भावाने प्रतिएकर ४० हजाराच्या दराने देऊन ज्यांनी स्वत: भूमिहिन होऊन दुसऱ्यांना उज्वल भविष्यासाठी आपली शेती दिली, अशा अन्नदाता शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली. वाटल्यास बांधातील पाणी साठवण्यासाठी इतर बाहेरील शेतकऱ्यांना बुडीत शेतीचा मोबदला त्या सर्वांना केव्हाचाच दुप्पट भावाने मिळाला ही वास्तविकता आहे.या सर्व घडामोडीवर पुन्हा १५ आॅक्टोबर २०१५ या जावक तारखेनुसार मागील वर्षी तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी तथा भूअर्जन अधिकारी यांच्याकडून पुनर्वसन अनुदान मिळण्याबाबतचे पत्र घुमर्रा येथील ७३ शेतकऱ्यांना मिळाले. ज्याप्रमाणे ७३ शेतकऱ्यांपैकी ६० शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे सादर करुन सुद्धा दर महिन्याला ७० किलोमीटर जाणे आणि परत येणे सतत असे १४० किमीचा प्रवास करुन सुद्धा अजुनही संबंधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही.या सर्व संबंधात ७ नोव्हेंबरला पुन्हा तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी तथा भूअर्जन अधिकारी सुनील सूर्यवंशी यांची घुमर्रा येथील सदर शेतकऱ्यांनी भेट घेतली असता त्यांनी एक महिन्याची मुदत मागितली आहे. परंतु यानंतरही अनुदान व मिळाल्यास १५ डिसेंबरनंतर गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसणार असल्याची माहिती सेवकराम कटरे, रमेश कटरे, हरिचंद फुंडे, सोमराज लांजेवार, तिलकचंद पटले, गोपाल बिसेन, लोकचंद पटले, नेतराम चौधरी, हेतराम कटरे, गुणवंत मानकर, नरेंद्र चौधरी, युवराज बिसेन, चैतराम पटले, रमेश चन्ने आणि सुरेश चन्ने या भूमिहिन झालेल्या शेतकऱ्यांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
घुमर्रा येथील शेतकरी बसणार उपोषणावर
By admin | Updated: November 11, 2016 01:29 IST