राधाकृष्ण विखे पाटील : भ्रष्टाचारी सरकारची करामतसडक अर्जुनी : मोदी सरकारने अच्छे दिन, मन की बात, प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये, शेतकऱ्यांच्या मालाला भाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू अशा जनतेला भूलथापा देवून खोटे बोलून ‘अच्छे दिन’च्या नावावर शेतकरी व जनतेची फसवणूक केली आहे. आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. अशा थापाबाज सरकारला त्यांची जागा दाखवून जि.प. व पं.स.मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांनाच निवडून द्या, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. सदर सभेला मार्गदर्शन करताना विखे पाटील म्हणाले, या सरकारमध्ये दररोज भ्रष्टाचार होत आहे. स्मृती इरानी, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे आणि पंकजा मुंडे यांचा ‘चिक्की घोटाळा’ समोर आला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांची डिग्री बोगस आहे. यावरून विद्यार्थ्यांनी कोणता आदर्श घ्यावा? असा टोलाही त्यांनी लावला. या प्रचार सभेला आ.सुनील केदार, माजी आ.सुभाष धोटे, अमर वऱ्हाडे, शेषराव गिऱ्हेपुंजे, राजेश नंदागवळी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिताराम देशमुख, अनिल राजगिरे, जि.प.सदस्य जागेश्वर धनभाते, बाबा कटरे, तालुका महिला काँग्रेसचे अध्यक्ष माया चौधरी, काँग्रेस पक्षाचे चिखली जि.प. उमेदवार माधुरी कोरे, पं.स. चिखलीचे उमेदवार मधुसूदन दोनोडे, कोकणाचे पं.स. उमेदवार शिवदास साखरे मंचावर उपस्थित होते. सभेला मार्गदर्शन करताना आ.केदार म्हणाले, धानाच्या विषयावरुन मोदी सरकार गंभीर नाही. सध्या धानाचे भाव कमी आहे. बोनस जाहिर केला, पण तो किती शेतकऱ्यांना मिळाला त्या बोनसचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना होणार आहे. माजी आ.सुभाष धोटे म्हणाले, या सरकारच्या काळात ‘सबका साथ सबका विकास’ असे म्हणून सरकारने सत्ता हस्तगत केली. पण विकास मात्र अंबानी, अदानीचा झाला. सर्वसामान्यांचा नाही. काँग्रेसला भरभरुन यश द्या, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक राजेश नंदागवळी, संचालन जागेश्वर धनभाते तर आभार दिनेश कोरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
‘अच्छे दिन’च्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक
By admin | Updated: June 27, 2015 02:24 IST