सालेकसा : आदिवासी नक्षलग्रस्त असलेल्या सालेकसा तालुक्यातील बेवारटोला सिंचन प्रकल्पाचा लाभ अजूनही या परिसरातील शेतकऱ्यांना होत नाही. या प्रकल्पाच्या पुर्णत्वाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या सिंचन प्रकल्पाच्या पाण्याचा अजुनही शेतकऱ्यांना उपयोग होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना मात्र अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकल्पाचे काम २००५ मध्ये सुरु करण्यात आले. डावा कालवा व उजवा कालवा याचे काम अजुनही अपूर्ण आहे. चांदसुरज गावाजवळील कालव्याचे काम अजुनही अपुर्ण आहे. जेथे जंगलाचा भाग आहे तेथे वन विभाग किंवा तांत्रिक अडचणीमुळे अजूनही कालव्याचे काम पुर्ण करण्यात आले नाही. बाजूलाच हावडा मुंबई रेल्वे मार्ग असल्यामुळे रेल्वे विभागाचीही परवानगी आवश्यक असते. ९० टक्के धरणाचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे पाणी संग्रह करण्याचे काम सुरु आहे. कालवा अपुर्ण असल्यामुळे या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. शेकडो शेतकरीचा पाण्याचा उपयोग करु शकत नसल्यामुळे शेतीच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.बेवारटोला हा प्रकल्प छत्तीसगडच्या सीमेजवळ असून दुर्गम अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रात आहे. या प्रकल्पाच्या आजूबाजूला डोंगर आहेत. सभोवताल जंगल आहे. या बेवरटोलाच्या बांधकामाच्या वेळी नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट केल्यामुळे ९ पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. तेव्हापासून या बेवारटोलाच्या प्रकल्पात अडचणी येणे सुरु आहेत. निधीची ही कमतरता शासनाकडून नेहमीच होती. या धरणाच्या माती बांधकामाचे काम ९० टक्के झाले आहे. डाव्या बाजूच्या कालव्याचे काम ६ किमीपर्यंत ८० टक्के व उजव्या बाजूच्या नहराचे ८ किमी पर्यंतचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. येथे दहा लाख घनमीटर पाणी मागच्या वर्षी होता. परिसरातील शेतकऱ्यांना पाण्यामुळे आपल्या शेतात जाता येत नाही. त्यांचा रस्ता बंद होतो. त्यांना लांब फिरुन शेतात जावे लागते. धरण बांधताना ही बाब लक्षात घेण्यात आली नाही. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात असल्यामुळे त्यांचेही नुकसान होते. दोन्ही बाजूंनी शेतकरी उडचणीत सापडले आहेत. उन्हाळ्यात या धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळू शकले नाही.या बेवरटोला प्रकल्पाला सुरु करण्यात आले. टोयागोंदी, विचारपूर, चांदसुरज, दलदलकुही, डहाराटोला, तुरमोडी, जमाकुडो, दर्रेकसा, धनेगाव, सुरजटोला, पीपरटोला, सोनारटोला, कोसतर्रा, टेकाटोला, सुकाटोला, नवाटोला, भर्टीटोपज या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला लाभ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडू शकते. या अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पाला पुर्ण करुन लवकर शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे या दृष्टीकोणातून जमाकुडोचे माजी सरपंच शंकरलाल मडावी यांनी अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केला. लवकरात लवकर प्रकल्प पुर्ण करुन आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा प्रशासनाने करुन द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)
बेवारटोला प्रकल्पाच्या लाभापासून शेतकरी वंचित
By admin | Updated: August 31, 2014 23:59 IST