निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे. शासनाने क्रमांक १ नुसार कोविडविषयक काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये एवढे सानुग्रह साहाय्य लागू केले होते व संदर्भ दोननुसार डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली होती; परंतु सध्या पुन्हा राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे शिक्षकांच्या सेवा मोठ्या प्रमाणात कोविडविषयक कामांसाठी (पेशंट ट्रेसिंग, कोविड सेंटरवर सुविधा पुरविणे, लसीकरण कामात साहाय्य करणे, इ. प्रकारच्या) अधिग्रहित केलेल्या आहेत. कोविडविषयक काम करताना संसर्गामुळे अनेक शिक्षक बाधित होत आहेत. तसेच काही शिक्षक कोविडविषयक काम करताना मृत्यू पावले आहेत. यामुळे सदर शासन निर्णयास ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने करण्यात आली असून, निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांना सानुग्रह साहाय्य योजनेची मुदतवाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:30 IST