शेतकरी चिंताग्रस्त : जिल्हा व तालुका प्रशासनाने तयारी ठेवावी काचेवानी : जून, जुलै आणि आॅगस्ट हे तीन महिने पावसाचे असतात. या महिन्यांत पावसाने धोका दिल्यास शेतकऱ्यांचे भवितव्य खरे नाही. गेल्या दहा वर्षांत या तीन महिन्यातील पावसाची सरासरी बघितल्यास कमी दिसून येईल. तिरोडा तालुक्यात पाऊस खूप कमी झाल्याने शेतकऱ्यांची शुद्ध हरपली आहे.सप्टेंबर महिन्यात पाऊस येतो, मात्र त्याचे प्रमाण फारच कमी असते. गेल्या तीन महिन्यांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सप्टेंबरमध्ये जोराचे पाऊस पडेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज आणि आशा आहे. शेतकऱ्यांना आशा असण्याचे कारण म्हणजे यावर्षी अधिक मास असल्याने पूर्ण सण एक महिना उशीरा होत आहेत. रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी यासारखे सण असल्याने या सणांच्या वेळी पाऊस येतो, अशी शेतकऱ्यांची समज आहे. अपवाद वगळता २० आॅगस्टपर्यंत कसे-बसे रोहण्यांची कामे संपली. मात्र पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. हलक्या जातीच्या धान्याची दशा खूपच वाईट होणार आहे. काही धान गर्भी (पोटरीवर) आहेत तर काही येत्या १५ दिवसात गर्भी येणार आहेत. गर्भावस्थेत धान असताना पाण्याचे प्रमाण अधिक लागते. अशा अवस्थेत पाऊस कमी झाले तर शेतकऱ्यांचे नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही. तिरोडा तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत सरासरी पावसाचे प्रमाण कमी असल्याने आणि १५ ते २० दिवसांत पावसाने दडी मारल्याने दुष्काळी समस्या टाळता येणार नाही, अशी चिंता कवलेवाडा क्षेत्राचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. त्यांनी प्रशासकीय यंत्रणेने दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहता तिरोडा तालुक्यातील संपूर्ण सरकारी यंत्रणेला सजग राहण्यास आणि नजर ठेवण्यास सांगण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने द्यावे, अशीही मागणी केली आहे. आॅगस्ट महिना संपलेला आहे. परंतु लहान-मोठे सरोवर निम्यापेक्षा कमी भरले आहेत. अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने पावसाचा साठा कमी असल्याने सिंचनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. यावर जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. (वार्ताहर)प्रशासनाने सतर्क असावे वरूण देवतेची अवकृपा दिसून येत असल्याने जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंचन विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित प्रशासनाने तसेच तालुका स्तरावरील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी संबंधित अधिनस्थ कर्मचारी व अधिकाऱ्यांना दुष्काळसदृश्य परिस्थितीकडे जातीने लक्ष द्यावे. तसेच संपूर्ण प्रशासनान सजग रहावे, अशी मागणी जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी केली आहे.
दृष्काळसदृश परिस्थितीची धास्ती
By admin | Updated: September 11, 2015 02:08 IST