गोंदिया : स्वच्छ भारताचे स्वप्न बघणाऱ्या पंतप्रधानांच्या संकल्पेला हातभार देण्यासाठी व जिल्हा स्वच्छ करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने सकारात्मक पाऊल उचलले आहे. संपूर्ण जिल्हा स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत २६ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१४ दरम्यान स्वच्छ ग्राम योजना राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला कार्यक्षेत्रातील किमान एक गाव स्वच्छ ग्राम करावे लागणार आहे. स्वच्छ ग्राम योजनेंतर्गत एका वर्षात जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायती स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी करावयाच्या असून या योजनेंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांच्यासह सर्वच जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील एका गावाची निवड करून त्याचे पालकत्व स्विकारून त्या गावाला स्वच्छ ग्राम करावयाचे आहे. यासाठी निवड करताना गावे ही शक्यतो निर्मल भरत अभियानात समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीतूनच निवड करुन ती नावे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे द्यावी लागणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही निधीची तरतुद करण्यात आलेली नसून प्रत्येकाने आपले गाव आपलीच जबाबदारी समजून लोकसहभागाने व श्रमदानाने हे काम करायचे आहे. स्वच्छ ग्राम योजनेत सबंधित अधिकारी व कर्मचारी यांनीही या मोहिमेमध्ये सहभागी होवून किमान आठवड्यातून एक दिवस या ग्रामपंचायतीमध्ये श्रमदान करावयाचे असून गाव स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी करण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहे. या योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व स्वच्छ, सुंदर, निर्मल व निरोगी असणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव, ग्रा.पं.सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांचा २६ जानेवारी २०१५ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे, असे पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून कळविण्यात आले.
प्रत्येक जि.प. सदस्य करणार एक गाव स्वच्छू
By admin | Updated: November 22, 2014 23:04 IST