सिरपूरबांध : राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान (आरजीएसए) व ‘आमचा गाव, आमचा विकास’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा २०२०-२१ ची गणस्तरीय कार्यशाळा शनिवारी (दि.३०) येथील ग्रामपंचायतच्या मैदानात घेण्यात आली.
कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून उपकार्यकारी अधिकारी (पंचायत) पुराम, खंडविकास अधिकारी सी.एल. मोडक, विस्तार अधिकारी (शिक्षण) डी.बी. साकुरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका डी.जी. नवथडे, पर्यवेक्षिका प्रामुख्याने उपस्थित होत्या. याप्रसंगी पुराम यांनी १५ व्या वित्त आयोगाचा विकास आराखडा तयार करीत असताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल असा पारदर्शक आराखडा तयार करण्यात यावा, तसेच विशेष करून शाळा व अंगणवाडीमध्ये मुलांना पिण्याकरिता शुद्ध पाणी, शौचालय, शिक्षणाकरिता डिजिटल सुविधा पुरविण्यावर भर द्यावा. त्याचप्रमाणे महिलांकरिता गृहउद्योग, कौशल्यविकास याकरिता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात यावे जेणेकरून त्यांचे व कुटुंबाचे जीवनमान उंचावेल असे सांगितले.
साकुरे यांनी आराखडा तयार करताना स्वच्छता, पाणी, हगणदारीमुक्त, तसेच शासनाच्या मार्गदर्शक पत्रकाप्रमाणे तयार करावे, असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले. या कार्यशाळेला भर्रेगाव, बोरगाव-बा, नकटी, सिरपूरबांध, डवकी येथील अधिकारी, पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक, अंगणवाडीसेविका आदींनी भाग घेतला. संचालन सचिव गणेश मुनिश्वर यांनी केले. आभार सचिव व्ही.के. गोबाडे यांनी मानले.