नवेगावबांध : भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत आयसीएआर बीज संरक्षण प्रकल्प पंजाबराव कृषी विद्यापीठ (अकोला) अंतर्गत येथील कृषी संशोधन केंद्रात शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिरुद्ध शहारे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाहुणे म्हणून उपसरपंच रघुनाथ लांजेवार, प्रगतशील शेतकरी अण्णा डोंगरवार, देवराम कोरे, सतीश कोसरकर, कृषी संशोधन केंद्राचे (साकोली) डॉ. जी. आर. शामकुवर, वरिष्ठ भात पैदासकार डॉ. मिलिंद मेश्राम, प्रभारी अधिकारी प्रा. रामचंद्र राऊत, डॉ. एन. के. कापसे उपस्थित होते.
यावेळी उन्हाळी भात, निज उत्पादन व उन्हाळी तीळ लागवड तंत्रज्ञान या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. राऊत यांनी उन्हाळी तीळ लागवडीसंबंधी मार्गदर्शन केले. शामकुवर यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठ निर्मित धान पिकांची सविस्तर माहिती दिली. डॉ. मेश्राम यांनी कडधान्य पिकांबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शहारे यांनी परिसरातील शेतकऱ्यांनी येथील कृषी संशोधन केंद्राच्या तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन केंद्रनिर्मित भात पिकाचे वाण वापरून उन्नती साधावी, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रा. कापसे यांनी केले तर प्राध्यापक राऊत यांनी आभार मानले. या प्रशिक्षणासाठी निखील बोकडे, शिरीष नागोसे, प्रेमानंद शहारे, आत्राम, झिंगरे, लाडे यांनी सहकार्य केले.