भंभोळी ते चांदोरी रस्त्याची दुर्दशा
मुंडीकोटा : जवळील ग्राम भंभोळी ते चांदोरी रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, हा रस्ता जीर्ण झाला आहे. रस्ता पूर्णपणे उखडला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकायदायक ठरत आहे.
वॉक करणाऱ्यांची संख्या वाढली
आमगाव : गुलाबी थंडीमुळे अगदी सकाळी फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. फिरणाऱ्यांच्या गर्दीने शहरातील सर्वच प्रमुख रस्ते गजबजून गेलेले दिसत आहेत. कोरोना काळात ऑक्सिजन लेवल वाढविण्यासाठी सकाळी फिरण्याचा उपयोग होत असल्याचे अनेकांनी सांगितले.
शाळा बंद असल्याने विद्यार्थी सैराट
सालेकसा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मार्च, २०२० पासून शाळा-महाविद्यालय बंद केले आहेत. जीवनावश्यक वस्तुंसाठी दुकानांचे लॉकडाऊन खुले करण्यात आले असून, जून, २०२० या वर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार होते, परंतु दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता आलेख लक्षात घेता, शैक्षणिक संस्था बंदच आहेत. त्यावर पर्याय म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षणप्रणाली देण्याचे धोरण निश्चित करून फोनमार्फत ऑनलाइन शिक्षण सुरू केले, परंतु सर्वच विद्यार्थ्यांकडे फोन उपलब्ध नाहीत. ज्या विद्यार्थ्यांकडे ॲन्ड्रॉइड फोन उपलब्ध आहेत, ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाचा उपयोग घेताना दिसून येतात, परंतु ज्याच्याकडे ॲन्ड्रॉइड मोबाइल नाही ते विद्यार्थी सैराट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
निराधार लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतले
गोंदिया : कोरोनामुळे घराबाहेर पडू शकत नसलेल्या वृद्ध व दिव्यांगांना विशेष साहाय्य योजनेचा लाभ मिळवून देता यावा, यासाठी ‘गृहभेट आपुलकीची’ ही संकल्पना अंमलात आणली जात आहे. याअंतर्गत तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना विभागातील कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद क्षेत्रातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचे अर्ज भरून घेतले.
प्रदूषण रोखण्यास मंडळाचे दुर्लक्ष
आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई होत नाही. ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याने नागरिक त्रासले आहे.
राइस मिल ठरत आहेत धोकादायक
गोरेगाव : राज्य मार्गावर असलेल्या राइस मीलमुळे वाहन चालकांच्या डोळ्यात धानाचा कोंडा उडत आहे. त्यामुळे डोळ्यात कचरा जाऊन वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता असते. रस्त्यावरील राइस मील बंद करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे
गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ग्रामीण भागामध्ये १ लाख किलोमीटर लांबीचे पांदण रस्ते व इतर खडीकरण रस्ते निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे.
नाल्यांअभावी पाणी वाहते रस्त्यांवरून
नवेगावबांध : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते करण्यात आले. मात्र, पुरेशा नाल्या खोदल्या नाही. ज्या ठिकाणी नाल्या खोदल्या तेथील नाल्याही नागरिकांनी बुजवून टाकल्याने सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत असल्याचे दिसते.
जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू
पांढरी : वन संपदेने नटलेल्या जिल्ह्यातील वनांमध्ये वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट दिसून येते. तस्करांनी वनविभागाचे दुर्लक्ष साधून वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसत आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
तिरोडा : तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. वीजपुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रोजगार हमीची कामे सुरू करा
केशोरी : जिल्ह्यातील केशोरी हा परिसर आदिवासी नक्षलग्रस्त व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाते. या भागात शेतीशिवाय इतर कोणतीही कामे उपलब्ध नाहीत. या वर्षी खरीप हंगामातील धानपीक नैसर्गिक रोगांच्या प्रकोपामुळे पूर्णत: नष्ट झालीत शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यावर उपासमारीचे संकट घोंगावत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या परिसरात रोजगार हमीचे कामे सुरू करण्याची मागणी होत आहे.