रावणवाडी : कोपलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रात पुन्हा एकदा शेतकरी फसला अहे. धानपिकावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यात बहुतांश पिके पस्त झाली असून काही पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगाला आटोक्यात आणण्याकरिता शेतकरी विविध कंपनीची महागडी किटकनाशकांची फवारणी करीत आहेत. मात्र हवामान उष्ण असल्यामुळे रोग आटोक्यात येताना दिसून येत नाही. कृषी विभागाने ग्रामपंचायत स्तरावर सवलतीच्या दरात किटकनाशक औषधे उपलब्ध करवून द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहे. त्यातून स्वत:च्या उत्थानासाठी सर्वतोपरी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र निसर्गाच्या दृष्टचक्रात फसगत होवून बळीराजा कर्जाच्या कचाट्यात सापडत आहे. अनेक वर्षापासून कधी पूर-महापूर तर कधी अवकाळी पाऊस, तर कधी कोरडा दुष्काळ, त्यात भर म्हणून विविध रोगांचे धानपिकावर आक्रमण अशा कालचक्राचा सामना त्यांना करावा लागत आहे. बळीराजाला शेतीसाठी खर्च अधिक तर त्या बदल्यात उत्पन्न कमी, अशी परिस्थिती आहे. मात्र धान उत्पादक बळीराजा आशावादी असल्याने आज नाही तर उद्या निसर्ग साथ देईल व कर्जाच्या बोझ्याची परतफेड करू, अशा आशेवर दरवर्षी तो शेती करतच आहे.यावर्षी पावसाळाच्या हंगामाला सुरूवात होऊनही दिड महिने पावसाचा एक थेंबही पडला नाही. शेतात पेरलेले धान जागीच फस्त झाले असून शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करून कशीबशी रोवणी केली. मात्र हवा तसा पाऊस या हंगामात न आल्याने बळीराज्याची चिंता अधिकच वाढली. काही ठिकाणी तर पिके वाळून गेलीत, कुठे सिंचनाची अपुरी सोय आहे. त्या ठिकाणची पिके पाण्याअभावी करपून गेलीत. तर सध्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून विविध किडी, करपा, खोडकिडा, तुडतुडा, मावू अशा अनेक रोगांनी ग्रासले आहे. तरी बळीराजा सर्वकस प्रयत्न करून पीक वाचवण्याचा प्रयत्नात गुंतला आहे. या पिकावरील रोगांवर दुबार-तिबार किटनाशकांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नाही. त्यामुळे शासनाने समस्येची दखल घेऊन कृषी विभागामार्फत सवलतींच्या दरात औषधी उपलब्ध कराव्यात, तसेच ग्रामपंचायत स्तरावरून खत वितरण करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
धान पिकावर अळींचे अतिक्रमण
By admin | Updated: September 22, 2014 23:22 IST