राजकुमार बडोले : सौंदड येथे ‘वादळवारा’ कार्यक्रमसडक अर्जुनी : भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांततेच्या माध्यमातून नागरिकांना हक्क व कर्तव्याची जाणीव करून दिली. शिक्षण हे प्रगतीचे द्वार असल्याने शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. बाबासाहेबांच्या या विचारामुळे आपण उच्चस्थ पदावर पोहोचलो. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. लॉर्ड बुद्धा मैत्री संघ सडक अर्जुनीच्या वतीने सौंदड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सव व भारतीय राज्य घटनेचा ६५ वा संविधान दिन, कर्मयोगी संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी ‘मी वादळ वारा’ या आंबेडकरी जलशाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भैया खैरकर, प्रवक्ते डॉ. भानू लोखंडे, नागेश चौधरी, के.ना. सुखदेवे, मनोहर मेश्राम, जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स. सभापती कविता रंगारी, पं.स. सदस्य गायत्री झटे, नगराध्यक्ष रिता लांजेवार, रुपाली टेंभुर्णे, दामोदर नेवारे, जगदीश लोहीया, रतन वासनिक उपस्थित होते.सर्वप्रथम गौतमबुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परिसंवादात डॉ. भानू लोखंडे, नागेश चौधरी, के.ना. सुखदेवे, मनोहर मेश्राम यांनी भारतीय संविधान, आंबेडकरी क्रांतीची दिशा व दशा, सामाजिक परिर्वतन व भारतीय संविधान, डॉ. आंबेडकर व संत गाडगेबाबा यांचे जीवनकार्य या विषयांवर विचार व्यक्त केले. चंद्रपूरचे कलावंत अनिरुद्ध वनकर यांनी ‘मी वादळ वारा’ हा कार्यक्रम सादर केला. प्रास्ताविक धनरूप उके, संचालन अनिल मेश्राम, राजकुमार भगत यांनी तर आभार ए.पी. मेश्राम यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा
By admin | Updated: December 28, 2015 02:06 IST