कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावातील पथदिव्यांचे वीज बिल कोण भरणार, हा विषय अद्याप सुटलेला नसल्याने वीज बिल थकलेल्या जिल्ह्यातील १८२ ग्रामपचायतींची बत्ती महावितरणने गुल केली आहे. परिणामी या गावांतील पथदिवे बंद असून, आता पावसाळ्याच्या तोंडावर ही गावे अंधारात आहेत. गावातील पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषदेकडून भरले जात होते. मात्र, मध्यंतरी शासनाने त्यावर बंदी लावली आहे. परिणामी गावातील पथदिव्यांपोटी ग्रामपंचायतींना येणारे भरमसाट बिल भरण्याची त्यांची ताकद नाही. अशात ग्रामपंचायतींवर वीज बिलाची थकबाकी वाढत चालली होती. थकबाकीच्या गंभीर समस्येशी महावितरण अगोदरच लढत असून, त्यात ग्रामपंचायतींची पथदिव्यांची कोट्यवधींची थकबाकी अधिकच डोकेदुखी ठरत होती. अशात महावितरणने ग्रामपंचायतींची जोडणी कापण्यास सुरूवात केली. महावितरणच्या या कठोर कारवाईमुळे मध्यंतरी चांगलेच वादळही उठले होते. त्यातच सरपंच संघटनांनी वीज या प्रकाराचा विरोध करून वीज बिल जिल्हा परिषदेने (शासनानेच) भरावे, यासाठी प्रयत्नही चालविले होते. मात्र, त्यानंतरही या विषयावर काहीच तोडगा निघाला नाही. कारण आजही जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींची बत्ती महावितरणने गुल केली आहे.
पावसाळा बघता गावकऱ्यांना भीती- पावसाळा म्हटला म्हणजे आजारांचा काळ असून, त्यात सरपटणारे विषारी प्राणीसुद्धा जोर घेतात. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात कीटक व सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका जास्त असतो. अशात महावितरणने पथदिव्यांची जोडणी कापल्यामुळे ही गावे अंधारात राहणार आहेत. यामुळे पावसाळा बघता गावकरी भीतीत वावरत आहेत.
२.८४ कोटींची थकबाकी
- महावितरणची जिल्हावासीयांवर अगोदरच कोट्यवधीच्या घरात थकबाकी असून, ती भरून काढण्यासाठी महावितरणकडून सातत्याने मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात वसुली होत नसून दरमहा त्यात भर पडत जाते. हाच प्रकार ग्रामपंचायतींच्या बाबतीत घडला असून, महावितरणचे १८२ ग्रामपंचायतींवर २,८४,०६,१९८ रुपये थकून आहेत. परिणामी महावितरणला एवढा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. सर्वाधिक थकबाकी अर्जुनी - मोरगाव तालुक्यावर - जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींवर महावितरणची २.८४ कोटींची थकबाकी असतानाच यातील सर्वाधिक १,६६,७४,१२१ रुपये अर्जुनी - मोरगाव तालुक्यावर थकून आहेत, तर सर्वात कमी थकबाकी तिरोडा तालुक्यावर ३,५१,४७३ रुपये एवढी आहे.