बाबासाहेबांना सर्वत्र आदरांजली : ठिकठिकाणी आकर्षक रॅलींनी वेधून घेतले लक्ष गोंदिया : भारतरत्न, क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती जिल्हाभरात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी ढोलताशाच्या गजरात निघालेल्या रॅलींमध्ये विविध देखाव्यांसह बाबासाहेबांच्या जयघोषाने गोंदिया शहरासह संपूर्ण जिल्हा दुमदुमून गेला. डिजेच्या तालावर भीमगीतांचा गजर करीत तरूणाईने ताल धरत सर्वांना थिरकायला लावले. तत्पूर्वी ठिकठिकाणी असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला हारार्पण करून नतमस्तक होण्यासाठी समस्त दलित, बहुजन समाजातील अनुयायांनी रांगा लावल्या होत्या. गोंदियात अनेक भागातून निघालेल्या रॅलींनी शहर गजबजून गेले होते. डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य रॅलीची परंपरा आहे. महिला-पुरूष, युवक-युवतींसह बालक आणि वृद्धही उन्हाची तमा न बाळगता मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी होऊन त्यांनी बाबासाहेबांवरची आपली श्रद्धा व्यक्त केली. अनेक भागातून निघणाऱ्या रॅली नंतर एकमेकांना भेटत एकत्रितपणे भव्य रॅली तयार होऊन शहराच्या प्रमुख मार्गाने फिरली. मुख्य मार्गाने निघालेल्या या रॅलीत ठोल-ताशे व डिजेच्या तालावर नाचत गात तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कसा शोभला असता भीम नोटावर.... यासारख्या अनेक गाण्यांवर नाचत तरूणाईने बाबासाहेबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा अर्पण केल्या. सर्व रॅलींचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात समारोप करण्यात आला. (शहर प्रतिनिधी) ठिकठिकाणी खाद्य पदार्थांचे वितरण सकाळपासूनच निघत असलेल्या या रॅलीत चिमुकल्यांपासून तर वयोवृद्धही सहभागी झाले होते. तहान व भूक लागल्यास इतरत्र जावे लागू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी खाद्य पदार्थ व पेयांचे वितरण केले जात होते. विविध सामाजिक संघटना, जनप्रतिनिधी व काही बांधवांकडून ही सर्व व्यवस्था करण्यात आली होती. यात शिक्षक संघ, शिक्षक समिती यासारख्या संघटनाही मागे नव्हत्या. त्यांनी टरबूज, लस्सी, ताक, पाणी, सरबत, मिल्कशेक, पुलाव, पोहे, उपमा आदी वस्तूंचे वितरण केले. गाणी आणि वेशभुषांमुळे स्फूर्ती बाबासाहेबांवरील सर्वच गाणी लोकप्रिय आहेत. यामुळेच रॅलीत बाबासाहेबांवरील ही गाणी प्रामुख्याने वाजविली जात होती. ही गाणी वाजताच आंबेडकरी बांधवांना एक स्फूर्ती मिळत होती. ‘कसा शोभला असता भीम नोटावर’ हे गाणे वाजताच त्यावर तरूणाई बेधूंद नाचताना दिसली. बाबासाहेबांचा जनमदिवस असल्याने त्यांच्यावरील ‘हॅप्पी बर्थ डे टू यू....’ या गाण्याचीही रॅलीत धूम होती. विशेष म्हणजे काही युवतींनी निळे फेटे बांधून आणि आपल्या ढोलपथकासह रॅलीत सहभागी होऊन चांगलीच स्फुर्ती आणली होती.
‘जय भीम’च्या गजरात दुमदुमला जिल्हा
By admin | Updated: April 15, 2017 00:46 IST