दोन राज्यातील यंत्रणा सज्ज : आंतरराज्यीय पूर नियंत्रण समितीची सभागोंदिया : पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीमुळे प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नद्यांना पूर येतो. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. मध्यप्रदेशातील सिवनी व बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, बावनथडी नदीकाठावरील अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण होते. येत्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी दोन्ही राज्यातील यंत्रणांनी योग्य समन्वयातून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात (दि.१०) आयोजित आंतरराज्य पूर नियंत्रण समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरु न डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी भंडारा जिल्हाधिकारी धीरजकुमार, गडचिरोली जिल्हाधिकारी ए.एस.रंगानायक, गोंदियाचे पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भूजबळ, भंडारा पोलीस अधीक्षक विनिता साहू, बालाघाट पोलीस अधीक्षक गौरव तिवारी, बालाघाटचे सहायक जिल्हाधिकारी मेहताबिसंग उपस्थित होते. डॉ.सूर्यवंशी म्हणाले, पुरपरिस्थितीच्या काळात संवादाची माध्यमे ही प्रभावीपणे कार्यरत राहावी. प्रत्येक प्रकल्पावर वायरलेस यंत्रणा सुस्थितीत कार्यरत असावी. पोलीस यंत्रणेने सुध्दा या काळात दक्ष राहून काम करावे. या काळात प्रकल्पावर पर्यायी दक्षता पथके तैनात करावी. संवादाची माध्यमे अशावेळी कुचकामी ठरण्यास ही पथके त्या गावात जावून संबंधित गावातील नागरिकांना जागृत करावे. पूरपरिस्थितीच्या काळात गावपातळीवरील यंत्रणांनी सज्ज राहावे, बोट, होड्या, नावा सुवस्थित असाव्यात. पोहण्यात तरबेज असलेल्या व्यक्तींची नावे यंत्रणांकडे उपलब्ध असावी. जी गावे पूरबाधित होतात अशा गावातील ग्रामस्थांची निवास व भोजनाची व्यवस्था चांगल्याप्रकारे केली जावी. महसूल व पोलीस विभागाची भूमिका या काळात महत्वाची आहे. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारऱ्यांनी सुध्दा सतर्क राहावे. हवामान खात्याने यंदा १३० टक्के पाऊस सांगितल्यामुळे प्रत्येकाने सजग राहावे. कोणतीही अप्रिय घटना या काळात होणार नाही यादृष्टीने काम करावे. प्रकल्पातून पाणी सोडताना इतर प्रकल्पात कार्यरत संबंधित अधिकाऱ्यांना व नदीकाठावरील ग्रामस्थांना पूर्वकल्पना द्यावी.धीरजकुमार यावेळी म्हणाले, बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर उदभवणाऱ्या पुरिस्थतीमुळे नदीकाठावरील गावे प्रभावित होणार आहे. या गावांना पूर्वसूचना देण्यात याव्यात. डॉ.भूजबळ म्हणाले, जे लोक पूरग्रस्त भागात अतिक्र मण करु न राहतात त्यांना तातडीने त्या भागातून हटविण्यात यावे. , बाघ प्रकल्प, पुजारीटोला, बावनथडी या प्रकल्पांची पाणीसाठा क्षेत्र याची माहिती, संजय सरोवरातून पाणी सोडल्यानंतर किती तासात पाणी गोंदिया जिल्ह्यात पोहचते याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता आर.के.ढवळे, मध्यम प्रकल्प गोंदियाचे कार्यकारी अभियंता व्ही.के.निखारे, गोंदिया पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नंदनवार, बाघ इिडयाडोहचे कार्यकारी अभियंता छप्परघरे, जलसंधारण विभाग बालाघाट येथील अधीक्षक अभियंता सुनिल सेठी, बालाघाटचे उपविभागीय अधिकारी कामेश्वर चौबे, बालाघाटचे कार्यकारी अभियंता, जलसंधारणचे सुभाष पटेल, शिवणी (मध्यप्रदेश) उपजिल्हाधिकारी के.सी.पराते, कार्यकारी अभियंता सुनिल व्यास, भंडारा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता एस.एस.चोपडे, संजय सरोवरचे उपअभियंता एस.के.धकाते, बालाघाट बावनथडीचे उपविभागीय अधिकारी डी.आर.रामटेके, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, संजय सरोवरचे उपविभागीय अधिकारी बी.एस.विदे, उपसा सिंचन मंडळ तिरोडाचे सहायक अभियंता एन.बी.गुरव, कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, गडचिरोलीचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, चंद्रपूरचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
योग्य समन्वयातून संकटावर मात
By admin | Updated: June 12, 2016 01:33 IST