संतोष बुकावन - अर्जुनी/मोर.सिलेझरी ते गुढरी रस्त्यावर खडीकरण झाले नसल्याने सिलेझरी व टोला येथील शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. या रस्त्याने शेतकऱ्यांना पायदळ जाणे सुध्दा अवघड होते. त्यामुळे या मार्गावर असलेल्या शेकडो हेक्टरमधील ९० टक्के शेतकरी धानपीकाची रोवणी न करता आवत्या पेरणी करून मोकळे होतात. या मागणीकडे कुणाचेही लक्ष नसल्याने सिलेझरी येथील शेतकऱ्यांत असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. सिलेझरी ते गुढरीदरम्यान १९२० मीटरच्या रस्त्यावर साचणाऱ्या चिखलामुळे शेतकऱ्यांना पुढे मार्गक्रमण करता येत नाही. एकमेकाच्या शेतामधून मार्ग काढत आपल्या शेतापर्यंत पोहचावे लागते. पावसाळ्यात सदैव होणारा हा त्रास आहे. गतवर्षी या रस्त्यावर ट्रॅक्टर अडकले होते. जाण्या-येण्याच्या त्रासामुळे शेतकरी सुध्दा हतबल होऊन कसबसे शेती करतात. मागील वर्षी काही शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली. मात्र या रस्त्याने ऊस बाहेर काढता येत नव्हता. अशावेळी काही फेऱ्या मुरूम खड्यात घातल्यानंतर ऊस बाहेर काढावा लागला या रस्त्याची गावकऱ्यांनी एकमुखी मागणी आहे. आ.राजकुमार बडोले यांनी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील दत्तक घेतलेल्या २० गावांपैकी सिलेझरी हे एक आहे. आमदारांनी या गावाला चार वेळा भेट दिली. या ग्रामपंचायतमध्ये घुसोबाटोला व डोंगरगाव या गावांचा समावेश आहे. येथील लोकस्ांख्या २ हजार आहे. शेती व मजुरी हा येथील गावकऱ्यांचा व्यवसाय आहे. कसलेही उद्योग, रोजगार निर्मिती नसल्याने गावकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामासाठी आतुरलेले असतात. या ग्रामपंचायतअंतर्गत सुमारे २० लक्ष रुपयांची तलाव, बोडी खोलीकरणाची कामे घेण्यात आली. तरी सुध्दा रोजगारासाठी नोंदणी केलेल्या मजुरांपैकी केवळ एक ते दोन कुटूंबाना वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात आले. इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात ग्रा.पं. यंत्रणेला अपयश आले. या गावात रोजगाराची साधने उपलब्ध नसल्याने २० टक्के लोक विशेषत: युवकवर्ग रोजगारासाठी बाहेर स्थलांतरीत होतात. या ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या घुसोबाटोला येथे पाण्याची टंचाई जाणवत असल्याचे सांगण्यात आले. गावापासून सुमारे ५०० मीटरवर शेतीपंप आहेत. सिंचनासाठी या पंपाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे गावातील विहीरीच्या पाण्याचे स्त्रोत आटतात. यासाठी घुसोबाटोला व डोंगरगाव येथे सौरउर्जेवर चालणाऱ्या पाणीस्त्रोत्रांचा प्रस्ताव सबंधित यंत्रणेकडे पाठविला आहे. मात्र अद्याप मंजूरी मिळालेली नाही. वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांचे १२५ प्रस्ताव पाठविण्यात आले. केवळ ८ ते ९ लोकांना पट्टे मिळाले नाहीत. सामुहिक दाव्यांचे प्रस्ताव मात्र अजूनही जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. यात जि.प. शाळा, शिवमंदिर, बौध्दमंदिर यांचा समावेश आहे.
पक्का रस्ता नसल्याने पीक उत्पादनात बाधा
By admin | Updated: August 9, 2014 23:48 IST