बसस्थानकावरील प्रकार : वाहतूक पोलिसांचाही दंडुकावर्धा : शहरातील वाहनतळाचा प्रश्न गत कित्येक वर्षांपासून खितपत आहे. यातच बसस्थानकावरील वाहनतळही हटविण्यात आले आहे. शिवाय बसस्थानक आवारात तीन ते चार ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे बसस्थानकावर वाहने ठेवायची कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बसस्थानकावर पार्किंगची सुविधा करण्यात आली होती. प्रवाश्यांची वाहने आणि वर्धेवरून दुसऱ्या गावात नोकरी करणारे कर्मचारीही याच ठिकाणी आपली वाहने ठेवत होते. यामुळे ती जागा अत्यंत अपूरी ठरत होती. शिवाय या पार्किंग व्यवस्थेमुळे अडचणीही निर्माण होत होत्या. यामुळे वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरून ते वाहनतळही बंद करण्यात आले. बसस्थानक आवारात तीन ते चार ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे आता प्रवाश्यांनी वाहने ठेवायची कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बसस्थानक प्रशासनाकडून बसस्थानक आवारात दुकानांच्या समोर वाहने ठेवण्याची जागा असल्याचे सांगितले जाते; पण बसस्थानक आवारात कुठेही वाहने दिसल्यास वाहतूक पोलिसांद्वारे कारवाई केली जाते. यामुळे बसस्थानक परिसरात वाहने ठेवण्यासाठी जागाच राहिलेली नाही. परिणामी, प्रवासी नो पार्किंग लिहिलेल्या फलकांसमोरच वाहने उभी करीत असल्याने नो पार्किंगचा फज्जाच उडाला आहे. वाहनतळ नसल्याने प्रवाश्यांना सोडण्यास व घेऊन जाण्यास येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने ठेवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसस्थानकावर प्रवाश्यांची दिवसभर गर्दी असते. सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रवाशांना सोडणे व घेण्यासाठी अनेक जण खासगी वाहनांनी येतात; पण पार्किंगची सोय नसल्याने त्यांची गोची होते. ना पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
वाहनतळ हटविल्याने ‘नो पार्किंग’चा फज्जा
By admin | Updated: September 24, 2015 02:40 IST