बेरडीपार शाखा : चेक दडपून खोट्या सहीने विड्रॉल काचेवानी : जवळच्या बेरडीपार (काचेवानी) येथील एका लहान धान्य व्यापाऱ्याच्या नावे स्पीड पोस्टद्वारे दोन चेकबुक पाठविण्यात आले होते. त्यातून प्रत्येकी एक चेक कमी मिळाला होता. कमी मिळालेल्या चेकद्वारे काही दिवसात ८० हजार रुपये विड्रॉल झाले. याप्रकरणी गंगाझरी पोलिसांनी बेरडीपार पोस्टाचे डाकपाल बिरनवार यांना अटक केली. तिरोडा तालुक्याच्या बेरडीपार येथील नकटू भिवा कटरे यांचे स्टॅट बँक तिरोडा येथे चालू खाते आहे. त्यांनी चेकची मागणी केली होती. मुख्य कार्यालय मुंबईवरुन स्पीड डाकने बेरडीपार येथील डाक कार्यालयात चेकबूक पाठविण्यात आले. पहिले चेकबुक ५ जानेवारी व दुसरे चेकबुक ४ फेब्रुवारीला देण्यात आले. चेकबुकची तपासणी करण्यात आली तेव्हा पहिल्या चेकमधून क्र. ७७८१२४ आणि दुसऱ्या चेकबुक मधून क्र.९४५९६८ चे चेक गायब होते. यासंबंधी शाखा डाकपाल दामोधर बिरनवारला विचारले असता वरूनच अर्धवट पॅक केल्याने त्याची अवस्था जीर्ण किंवा सील नाहीसे होते, असे उत्तर दिले होते. एक चेक कमी असल्याबद्दल बँकेनेच कमी पाठविले असावे, असे बिरनवार यांनी कटरे यांना सांगितले होते. दरम्यान खातेदार कटरे यांच्या खात्यातून ८० हजार रुपये विड्रॉल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सी.सी.टी.व्ही.कॅमेऱ्याच्या फुटेजवरून दुसऱ्या चेकद्वारे ७ मार्च २०१७ रोजी दुपारी ३.०४ वाजता ४० हजार रुपये विड्रॉल करण्यात आल्याचे समजले. विड्रॉल करण्यात आलेल्या चेकवर डुप्लिकेट स्वाक्षऱ्या असल्याचेही दिसून आले. पहिला चेक २३ फेब्रुवारीला ४० हजार रुपयांचा बँकेत जमा करून कलेक्शनकरीता कामाख्या पांडा गॅमन इंडिया काचेवानी यांच्या नावे असलेल्या खात्यामार्फत वठविल्याचे उघड झाले होते. या प्रकरणाची तक्रार नकटू कटरे यांनी गंगाझरी पोलिसात केली होती. गंगाझरीचे सहा.पोलीस निरीक्षक बळीराम घंटे यांनी शाखा व्यवस्थापक दामोधर बिरनवारला जाळ्यात घेण्यासाठी सापळा लावला. त्या आधारे १२ एप्रिलच्या रात्री आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले.(वार्ताहर)
डाकपालाच्या अटकेने येणार ८० हजारांचा घोळ उघडकीस
By admin | Updated: April 15, 2017 00:49 IST