खातिया : गोदिया तालुक्यात अनेक गावांमध्ये एसटी बसेसकरिता प्रवासी निवारे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना दररोज या निवाऱ्यामध्ये थांबून एसटी बसची वाट पहावी लागते. परंतू कोणत्याही प्रवासी निवाऱ्याजवळ शौचालयाची सुविधा नाही. त्यामुळे लघुशंकेला कुठे जावे अशी समस्या सर्व प्रवाशांना असते. यात महिला व विद्यार्थिनींची मोठी कुचंबना होत आहे. परंतू ग्रामीण भागातील या समस्येकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही.अनेक प्रवाशांना वेळेवर बस किंवा इतर प्रवासी वाहने न मिळाल्याने प्रवासी निवाऱ्यांमध्ये वाट पाहात बसावे लागते. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांच्या लहान मुलांना बस स्थानकाच्या जवळपासच शौचास बसवण्यात येते. त्यामुळे संबंधित परिसरात दुर्गंधी पसरते. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसात यातून रोगराई पसरण्यास सुरूवात होते. त्यामुळे ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. प्रशासनाने मात्र याकडे पुर्णत: दुर्लक्ष केले आहे. शासनातर्फे स्वच्छ परिसर ठेवण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियानही राबविण्यात येते. यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपयांचा खर्च केला जातो. पण सार्वजनिक बस थांब्याजवळ शौचालये नसल्याने प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गोंदिया तालुक्यात बहुतांश गावांमध्ये प्रवासी निवारे आहेत. त्यात दररोज हजारो प्रवासी आश्रय घेतात. पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या अधिक तीव्रपणे जाणवते. परंतू ही समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेतलेला नाही. आमदार फंडातून काही मुख्य गावांमध्ये प्रवासी निवाऱ्याजवळ शौचालयाची किंवा मुत्रीघराची सोय करावी अशी मागणी परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
शौचालयांअभावी विद्यार्थी व प्रवाशांची होतेय कुचंबना
By admin | Updated: July 18, 2014 00:10 IST