लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आंबेडकर चौक कुडवा नाका येथील मिरावंत हॉस्पिटलमध्ये कोविडचा रूग्ण घेऊन एकजण आला. परंतु, त्या रूग्णाला रूग्णालयात दाखल न केल्यामुळे संतापलेल्या रूग्णाच्या या नातेवाईकाने डॉक्टरांच्या कानशिलात लगावली. ही घटना २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजताचे दरम्यान घडली.
डॉ. राजेंद्र यशवंत वैद्य (३७, रा. आंबेडकर चौक, कुडवा) हे मिरावंत हॉस्पिटल, कुडवा नाका, गोंदिया येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. २३ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता एकजण कोविड रूग्ण घेऊन दवाखान्यात आला व त्याने माझ्या रूग्णाला दाखल का करीत नाही, म्हणून दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. डॉ. राजेंद्र वैद्य यांच्यासोबत कोविड रूग्ण भरती करण्याच्या कारणावरून वाद घालतानाच त्यांना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करत थापडाने गालावर, पाठीवर या नातेवाईकाने मारहाण केली. इतकेच नव्हे तर डॉक्टरांना खाली पाडले. त्यामुळे डॉक्टरांनी घातलेला चश्मा खाली पडला व फुटला. त्यानंतर त्यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३२३, २९४, ४२७, ५०६सह कलम ३ (१) (आर) (एस) अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१५ सहकलम - ४ महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिसंक कृत्य व मालमत्तेची हानी किंवा नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१० अन्वये रुग्णाच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे करत आहेत.