अफलातून फर्मान : आरोग्य समितीचे कृत्यआमगाव : तालुक्याची आरोग्य सेवा सांभाळणाऱ्या रुग्णालयावर निर्णयक्षमता नसलेल्या समितींकडून वर्चस्व गाजविल्या जात असल्याने आरोग्य सेवेचे तीनतेरा वाजत आहे. आमगाव येथील बनगाव प्राथमिक उपचार केंद्राचे मुख्य दार बंद करण्याचा सुलतानी निर्णय याच समितीने काढल्याने आरोग्य सेवा घेणाऱ्या येणाऱ्या रुग्णांना भ्रमित व्हावे लागत आहे. आमगाव तालुक्यात सर्वाधिक आरोग्य सेवा पुरवणाऱ्या बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे आधीच रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात अधिक तांत्रिक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नागरिकांची मागणी प्रतीक्षेत आहे. परंतु जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या वेळकाढुपणामुळे रुग्णांना योग्य सेवा मिळणे कठीण होत आहे. रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे पद रिक्त आहे. यामुळे रुग्णांना खाजगी प्रयोगशाळांकडे वळावे लागत आहे. याकडे आरोग्य समितीचे लक्ष वेधण्याऐवजी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण कसे येईल असाच प्रयत्न चालविला आहे. बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांसाठी संजीवनी बनून पुढे येत आहे. परंतू या रुग्णालयात अत्याधुनिक सेवांची पूर्तता करणे आवश्यक आहे. रुग्णालय परिसरात बाहेरच्या व्यावसायिकांकडून दररोज घाण टाकणे सुरू आहे. याकरिता त्या व्यवसायीकांना रितसर नोटीस बजावून कारवाई होणे अपेक्षित होती. या कारवाईला पुढे न जाता आरोग्य समितीने नागरिक व रुग्ण ज्या मुख्य प्रवेशव्दारातून तातडीने प्रवेश करायचे त्या प्रवेशव्दारालाच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्राच्या प्रवेशव्दाराला कुलूपबंद करण्यात आले. या प्रकारामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रुग्णालय बंद असल्याचा भास होऊन रुग्ण परत जात असल्याचे उघड झाले. रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी दुसऱ्या ठिकाणावरून प्रवेश मिळत असल्याने खड्ड्यातून पायवाट काढण्याची पाळी रुग्णांवर आली आहे. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशव्दाराचे कुलूप उघडून रुग्णांना होणारी अडचण दूर करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत विचारणा केली असता रुग्णालय परिसरात जवळच्या व्यवसायिकांनी घाण टाकणे सुरू केल्याने ती घाण पसरू नये यासाठी आरोग्य समितीने मुख्य दाराला कुलूपबंद केले आहे. परंतु घाण टाकणाऱ्यांवर कारवाई अपेक्षित आहे, असे रुग्णालयातील डॉ.रवी शेंडे यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)
आरोग्य केंद्राचे दार कुलूपबंद
By admin | Updated: September 20, 2014 23:52 IST