आरोपींचा दहशतवादी कारवायात सहभाग?
आमगाव : आमगाव पोलिसांनी बनावट डॉलर प्रकरणात पकडलेल्या आरोपींकडून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बांगला देशी आरोपी देशातील दहशतवादी कारवाईत सहभागाी असण्याची शक्यता बळावल्याने पोलिसांचे तपासचक्र त्यादृष्टीने फिरत आहे. आंतरराष्ट्रीय टोळीकडून बनावट डॉलर कमी किंमतीत विकून नागरिकांना फसविण्याचे प्रकार राज्यात अनेक ठिकाणी आढळून येत आहे.
या टोळीने गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे बनावट डॉलर सोपवून अनेकांना रोख रक्कम घेऊन लुबाडले. या प्रकरणात आमगाव येथील सोनु भांडारकर याला बनावट डॉलर देऊन २ लाख ९० हजार रुपयांनी गंडविले. सदर प्रकरणात या टोळीतील महिला आरोपीने २१ एप्रिल ते २६ एप्रिल पर्यंत सोनू भांडारकर यांच्या संपर्कात राहून फसवणूक केली. परंतु फसवणूक कळताच सोनू भांडारकर याने आमगाव ठाणे येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीचा तपास करताच पोलिसांनी तीन आरोपींना पकडण्यात यश आले. यात बांगलादेश सरयादपूर येथील इस्माईल अहमद खाल भोईया, अहमद कमल अब्दुल रहीम चौधरी, राणी अहमद कमल चौधरी समावेश होता. सदर प्रकरणात एकूण नऊ आरोपींना पकडण्यात यश मिळाले.
या आरोपीकडून अमेरिकन चलनातील डॉलर, बांगलादेशाचे चलन व रोख रक्कम व बनावट आधार कार्ड हस्तगत करण्यात आले. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये दहशतवाद कारवाईत सहभाग असल्याचा संशय पुढे येत आहे. मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याने गुढ माहिती गवसण्यासाठी सध्या पोलीस तपास करीत आहेत. न्यायालयाने तीन मुख्य आरोपींना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (शहर प्रतिनिधी)