गोंदिया : नववर्षाची चाहून लागल्याने या नववर्षाचे स्वागत कशा पद्धतीने करायचे याचे बेत आखण्यास सुरूवात झाली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री हजारो कोंबड्या-बकऱ्यांच्या कत्तली होतील, मद्याच्या नशेत झिंगत अनेक जण ‘हॅपी न्यू इयर’ म्हणतील. पण नवीन वर्षाचे अशा पद्धतीने स्वागत करण्याची ही संस्कृती आपली नाही. भारतीय संस्कृतीचे भान ठेवत युवा वर्गासह सर्वांनी या दिवशी वेगळ्या पद्धतीने आनंद साजरा करावा. नवीन संकल्प करावे. सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावे आणि आपल्यासोबत दुसऱ्यांनाही आनंद द्यावा, असे मत गोंदियातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत परिचर्चे’त व्यक्त केले. ३१ डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस. या दिवशी सर्वच नागरिक नवीन वर्षाच्या शुभारंभासाठी आपल्या विविध योजना आखतात. मोठे लोक बार अॅन्ड रेस्टॉरेंटमध्ये, काही लोक शेतात जावून पार्ट्या करतात तर काही आपल्या घरी व मोहल्ल्यातच हा उत्सव साजरा करतात. मात्र या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन केले जाते. मात्र कोणताही उत्सव-समारंभ मद्यप्राशनाने साजरा करणे योग्य नाही, असे मत मान्यवरांनी मांडले.या दिवशी मद्य प्राशन करून सुसाट गाडी चालविल्याने वाहनांचे अपघात होतात. यातून स्वत:सोबत दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतात. एखाद्या दारूड्या चालकाने समोरच्याला धडक दिली, तर त्या व्यक्तीचे किती नुकसान होते, याची कल्पना येते. याबाबत गोंदिया शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत आबकारी विभागाकडून ३१ डिसेंबरला बार मालकांना रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाते. यात ग्रामपंचायत क्षेत्र, नगर परिषद व महानगर पालिका क्षेत्रासाठी वेगवेगळ्या वेळा ठरविल्या असतात. त्यामुळे त्यांना अधिक वेळपर्यंत बार चालू ठेवण्याची मूभा मिळते. मात्र नेमका याच गोष्टीचा फायदा घेत काही मद्यपी रात्री उशिरापर्यंत बारमध्येच राहून मद्यसेवनाने नववर्ष साजरे करतात. ही बाब चुकीची असून मद्याचे सेवन न करता आपल्या कुटुंबीयांसह हा उत्सव साजरा करणे केव्हाही योग्य, असे ते बोलले. (प्रतिनिधी)
मद्यप्राशनाने नाही, नवसंकल्प करून नववर्षाचे स्वागत करा
By admin | Updated: December 27, 2014 22:52 IST