गोंदिया : जिल्ह्यात मागील महिनाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८२ वर आली आहे. चार महिन्यांपूर्वी बाधितांची संख्या ५०० ते ६०० होती ती आता बरीच खाली असून, जिल्ह्यात कोरोनाला उतरती कळा लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. कोरोना होण्याचे प्रमाण ९६.८० टक्के आहे, तर राज्याचा रिकव्हरी दर ९२.८३ टक्के आहे. राज्यापेक्षा ४ टक्क्यांनी जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर जास्त असल्याने ही समस्त जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
रविवारी जिल्ह्यात ५ कोरोनाबाधित आढळले, तर १८ बााधितांनी कोरोनावर मात केली. बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा आलेख सातत्याने खाली येत आहे. रविवारी आढळलेल्या पाच रुग्णांमध्ये ४ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे, तर एक रुग्ण आमगाव तालुक्यातील आहे. सहा तालुक्यांत कोरोनाबाधितांची संख्या अवघी १ ते २ असल्याने हे तालुके लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्ता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात ६६,७४२ जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५५,०६२ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत ६६,१७४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६०,०४५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४,२५२ बाधित आढळले असून, यापैकी १३,९८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ८२ ॲक्टिव्ह रुग्ण असून, ८२ स्वॅब अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.