सडक/अर्जुनी : जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी सडक/अर्जुनी तालुक्यातील डव्वा, खजरी, परसोडी, सावंगी येथील धानाच्या पऱ्ह्यांची पाहणी केली. त्यांनी मोटार पंपने रोवणी करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात भेट देवून सिंचन सुविधांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रोवणी झालेल्या शेतात आवत्या धान पिकाचे, हिरवळीचे खत म्हणून पेरलेल्या ढेचा पिकाचीसुद्धा पाहणी केली. यावेळी शेकडो शेतकऱ्यांकडून त्यांनी धानपिकाच्या रोपांच्या नुकसानीबाबतचे मत जाणून घेतले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपविभागीय कृषी अकिधारी युवराज शहारे, नायब तहसीलदार चुऱ्हे, तालुका कृषी अधिकारी डी.एस. पेशट्टीवार, मंडळ कृषी अधिकारी एफ.आर.टी. शहा उपस्थित होते.यावेळी व्ही.एस. पेशट्टीवार यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे रोवणीकरिता धानाची रोपे कमी पडतील, त्यामुळे रोवणी दोरीने सरळ रेषेत करुन एका ठिकाणी एक ते दोन रोपाचीच लागवड करण्याचे आवाहन केले. दरम्यान डव्वाचे माजी सरपंच माया चौधरी, सोहनलाल चौधरी, कृषीमित्र सचिन रहांगडाले, येल्ले, कृषी सहाय्यक मेश्राम, ब्राह्मणकर, धांडे, अपूर्वा गहाणे, चिंधू चौधरी, रेकचंद शरणागत व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.सडक/अर्जुनी तालुक्यात धान पिकाचे क्षेत्र १८ हजार ३०० हेक्टर असून यापैकी ८५ ते ९० टक्के क्षेत्र कोरडवाहू क्षेत्र आहे. ओलीत क्षेत्रापैकी बोर व विहिरीचे साधन असणाऱ्या क्षेत्रापैकी १३० हेक्टर क्षेत्रात रोवणी झाली आहे. उर्वरीत कोरडवाहू क्षेत्राच्या रोवणीचे काम हे पावसाअभावी खोळंबले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी केली नुकसानग्रस्त धानरोपांची पाहणी
By admin | Updated: July 10, 2014 23:41 IST