देवानंद शहारे
गोंदिया न्यायालयावरील भार व ताण कमी करण्यासाठी लोकन्यायालयाच्या वतीने तडजोडीद्वारे विविध प्रकरणे सोडविली जातात. लोकन्यायालयाने वर्षभरात जिल्ह्यातील एकूण १४६१ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा केल्याची नोंद जिल्हा न्याय प्राधिकरणाने केली आहे. यात मोटारवाहन कायदा, प्राकरणात लेखा अधिनियम (चेक बाऊंस प्रकरणे), दिवानी व फौजदारीसह पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणांचा समावेश आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१३ या वर्षभराच्या कालावधीत लोकन्यायालयाने मोटार वाहन कायद्याची ९ प्रकरणे, चेक बाऊंसचे (एनआय अॅक्ट) २९ प्रकरणे, दिवानीचे ४८ प्रकरणे, फौजदारीचे ३३८ खटले व पूर्व न्यायप्रविष्ट १०३७ प्रकरणे अशा एकूण १४६१ प्रकरणांचा निपटारा तडजोडीने केला. त्यामुळे न्यायालयावरील ताण बर्याच प्रमाणात कमी झाला आहे.
यात गोंदिया तालुक्यातील मोटार अपघात कायद्याचे ९, चेक बाऊंसचे १०, दिवानीचे २५, फौजदारीचे ७६ व पूर्व न्यायप्रविष्ट १७५ अशा एकूण २९५ प्रकरणांचा समावेश आहे. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील चेक बाऊंसचा एक, दिवानीचे १०, फौजदारीचे ११० व पूर्व न्यायप्रविष्ट ५६ अशा एकूण १७७ प्रकरणांचा समावेश आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील फौजदारीचे १७ तर पूर्व न्यायप्रविष्ट ८६ अशा एकूण १०३ प्रकरणांचा समावेश आहे. देवरी तालुक्यातील दिवानीचा एक, फौजदारीचे १३ व पूर्व न्यायप्रविष्ट १२० अशा एकूण १३४ प्रकरणांचा समावेश आहे. आमगाव तालुक्यातील चेक बाऊंसचा एक, दिवानीचे ८, फौजदारीचे ३१ तर पूर्व न्यायप्रविष्ट ४३७ अशा एकूण ४७७ प्रकरणांचा समावेश आहे. तसेच तिरोडा तालुक्यातील चेक बाऊंसचे १७, दिवानीचे ४, फौजदारीचे ९१ व पूर्व न्यायप्रविष्ट १६३ अशा एकूण २७५ प्रकरणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सन २०१३ च्या जानेवारी, फेब्रुवारी, मे, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर व डिसेंबर महिन्यात लोकन्यायालयाचा कसलाही शेड्युल नव्हता. मार्च, एप्रिल, जून व नोव्हेंबर या केवल चार महिन्यातच लोकन्यायालयाने मोठ्या प्रमाणात विविध प्रकरणांचा निपटारा तडजोडीने केल्याची नोंद आहे. त्यातही वर्षभरातील केवळ दोनच महिन्यात सर्वाधिक प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. यात मार्च महिन्यात ६३७ व नोव्हेंबर महिन्यात सोडविण्यात आलेल्या ७४३ प्रकरणांचा समावेश आहे.
तालुका व महिनानिहाय सोडविलेली प्रकरणे गोंदिया, अर्जुनी/मोरगाव, सडक/अर्जुनी, देवरी, आमगाव व तिरोडा या तालुक्यातील मोटार अपघात कायद्याची, चेक बाऊंस, दिवाणी, फौजदारी व पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांचा महिन्यानिहाय केलेला निपटारा असा आहे. जानेवारी महिन्यात केवळ एक प्रकरण, मार्च महिन्यात एकूण ६३७ प्रकरणे, एप्रिल महिन्यात एकूण २६ प्रकरणे, जून महिन्यात २७ प्रकरणे, आॅगस्ट महिन्यात ५ प्रकरणे, सप्टेंबर महिन्यात एकूण १३ प्रकरणे, आॅक्टोबर महिन्यात एकूण ९ प्रकरणे व नोव्हेंबर महिन्यात एकूण ७४३ प्रकरणे अशा एकूण १४६१ प्रकरणांचा निपटारा वर्षभरात तडजोडीने करण्यात आला आहे. यात गोंदिया तालुक्यातील एकूण २९५, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील एकूण १७७, सडक/अर्जुनी तालुक्यातील १०३, देवरी तालुक्यातील १३४, आमगाव तालुक्यातील एकूण ४७७ व तिरोडा तालुक्यातील २७५ प्रकरणांचा समावेश आहे.
सोडविलेली ‘एक्स कॅडर’ कोर्ट प्रकरणे
लोकन्यायालयाने जिल्ह्यातील मोटार वाहन, चेक बाऊंस, दिवानी, फौजदारी व पूर्व न्यायप्रविष्ट अशा एकूण १४६१ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा तर केलाच, परंतु याशिवाय लेबर कोर्ट, असिस्टंट चॅरिटी कमिश्नर (सहायक धर्मदाय आयुक्त) व कंझुमर फोरमच्या प्रकरणांचीसुद्धा सन २०१३ मध्ये सोडवणूक केली. यात लेबर कोर्टची मार्च महिन्यातील ४ व नोव्हेंबर महिन्यातील २५ अशा एकूण २९ प्रकरणांचा निपटारा केला. सहायक धर्मदाय आयुक्त विभागाचे मार्च महिन्यातील १२० व नोव्हेंबर महिन्यातील ११३ अशा एकूण २३३ प्रकरणांचा निपटारा केला. शिवाय कंझुमर फोरमच्या नोव्हेंबर महिन्यातील दोन प्रकरणांचा निपटारा करण्यात आल्याची नोंद न्याय प्राधिकरणाने घेतली आहे.