सौंदड : सौंदड येथे जानेवारी २०१४ मध्ये ग्रामपंचायतद्वारे गावातील अतिक्रमण हटविण्याचा देखावा केला होता. सरपंच व सचिवाने कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता पोलीस दंडुकेशाहीच्या बळावर गरीब-श्रीमंत असा भेदभाव करून गावात अतिक्रमण मोहीम राबविली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या प्रकाराबाबत भूमिअभिलेख अधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी अतिक्रमण पाडलेल्या जागेवर ग्रा.पं.चा रस्ता नसल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे सरपंच व सचिव यांनी केवळ विरोधी पक्षाच्या आकसापोटीच हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे.ग्रामपंचायतमध्ये सत्ताबदल झाल्यापासून आजही अतिक्रमण करणे सुरूच आहे. गांधीवार्ड, कृष्णवार्ड व शास्त्रीवार्ड येथे अधिक अतिक्रमण झाले आहे. येथील माजी ग्रा.पं. सदस्यांनी राजरोसपणे चक्क ग्रा.पं.च्या रस्त्यावरच बांधकाम केले आहे. याकडे ग्रामपंचायत व तंटामुक्त समितीसुद्धा दुर्लक्ष करीत आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये मारूती डोंगरवार ते डॉ. भेलावे यांच्या घरापर्यंत १० लोकांची घरे पाडण्यात आली होती. आत त्याच सरळ रस्त्यावर नामदेव वर्मा यांच्या आटाचक्कीपासून ते पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत रस्त्यावर अतिक्रमण सुरू आहे. परंतु सरपंच, सचिव व सदस्य अतिक्रमण रोखण्याचे धाडस न दाखविता बघ्याची भूमिका घेत आहेत. गावात सत्ताबदल झाली की नवीन पदाधिकारी व सचिव आपला रूबाब दाखवित मागील पदाधिकाऱ्यांच्या काळात झालेले अतिक्रमण हटवितात. अतिक्रमण काढतानाही गरीब व श्रीमंत असा भेद करून गब्बर लोकांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केले जाते. ज्या सरपंच, सदस्य व सचिवाच्या कार्यकाळात अतिक्रमण करण्यात आले, त्यांच्यावर शासनाने कारवाई करण्याची गरज आहे. (वार्ताहर)
अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव
By admin | Updated: February 18, 2015 01:42 IST