सालेकसा : जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या येथील पंचायत समिती शिक्षण विभागात सावळा गोंधळ सुरू असून शिक्षकांवर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे शिक्षक मनमर्जीने शाळेत येत-जात असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झालेले आहे. शिक्षण विभागाच्या वतीने दर शनिवारी सकाळ पाळीत शाळा सकाळी ७.३० ते ११.३० पर्यत ठेवण्यात यावी असा नियम आहे. त्यानुसार दर शनिवारी सकाळ पाळीत शाळा ठेवण्यात येते. पण मुख्यालयात न राहणारे शिक्षक हे शनिवारी सकाळी ८ वाजतानंतर पोहचून आपल्या दैनंदिन कार्याला प्रारंभ करतात. सकाळी ७.३० वाजता प्रार्थना करणे व त्यानंतर शारीरिक व्यायामाच्या तासिका असतात. पण ते शिक्षक या कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही. गोंदियावरून ७ वाजता सुटणारी मेमू ट्रेन सालेकसा, दर्रेकसा रेल्वे स्थानकावर ८ वाजता दरम्यान येत असते. येथून शिक्षक मग आपापल्या शाळेत पलायन करीत असतात. हा सगळा प्रकार केंद्र प्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांना माहिती आहे. परंतु अजूनपर्यंत शाळेत वेळेवर हजर न होणाऱ्या शिक्षकांवर कोणतीही कारवाई शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही. गावची शाळा आमची शाळा या प्रकल्पाव्दारे उत्तम गुणवत्ता धारक विद्यार्थी घडविणे हा शिक्षण विभागाचा उद्देश असतांना शाळेत वेळेवर हजर न राहणारे हे शिक्षक या प्रकल्पाचा फज्जा उडवीत असल्याचे दिसून येत आहे. विचारपूर, बंजारी, दर्रेकसा, पिपरिया, पांढरवाणी, बिजाकुटूंब, कोटरा, मक्काटोला, आमगावखुर्द, नवाटोला, गल्लाटोला, पाऊलदौना आदी परिसरातील शाळेत शिक्षक ८ वाजतानंतर येत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावची शाळा आमची शाळा हा उपक्रम योग्य प्रकारे राबवायचा असेल तर अगोदर वेळेची शिस्त शिक्षकांनाच शिक्षण विभागाने लावणे आवश्यक आहे.पण अजूनपर्यंत असे कार्य शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी न केल्यामुळे शिक्षक आपल्या मनमर्जीने शाळेत जाणे-येणे करीत असतात. मात्र यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल याचा विचार मुख्यालयात न राहणारे शिक्षक कधीच करीत नाही. ही गावची शाळा आमची शाळा प्रकल्पाची शोकांतिका असल्याचे दिसून येते. एकंदर गाडीच्या वेळापत्रकावर या शिक्षकांची ये-जा अवलंबून असल्याचे चित्र शाळांमध्ये बघावयास मिळत आहे.
शिक्षकांच्या अपडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
By admin | Updated: August 5, 2014 23:31 IST