आश्रमाची घेतली माहिती : सर्वधर्म प्रार्थनेतही सहभाग सेवाग्राम : महात्मा गांधी विचाराची माहिती सर्वसामान्यांना देण्याकरिता अनेक गांधीवादी संस्था कार्यरत आहेत. त्यातीलच एक गांधी स्मृती दर्शन समिती आहे. दिल्लीत असलेल्या या समितीचे संचालक डॉ. दिपांकर ज्ञान यांनी शनिवारी वर्धेत येत सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी पुस्तकात असलेल्या सेवाग्राम आश्रमाची इत्यंभूत माहिती घेतली. डॉ. ज्ञान आश्रमात आले असता आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी सूत माळ, गीता प्रवचन, सेवाग्राम आश्रम व बापुकूटी सेवाग्राम आश्रम अशी पुस्तके देत त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी आश्रमातील साधक आणि इतर पदाधिकारीही उपस्थित होते. आश्रमातील मार्गदर्शिका प्रभा शहाणे यांनी डॉ. ज्ञान यांना आश्रम परिसरात असलेल्या संपूर्ण स्मारकांची माहिती देत त्याचा इतिहास त्यांना सांगितला. यानंतर बापुकूटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना व भजन झाले. या प्रसंगी मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव, अधीक्षक भावेष चव्हाण, हिराभाई, अरुण लेले, भैय्या मशानकर, नामदेव ढोले, विजय धुमाळे, विजय डोबले, मार्गदर्शक संगिता चव्हाण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. ज्ञान यांनीही सेवाग्राम आश्रम विश्वाला मार्गदर्शक असल्याचा अभिप्राय दिला.(वार्ताहर) आश्रमातून विश्वाला दिशा आश्रमात प्र्रवेश करताच एका वेगळ्याच ऊर्जेचा संचार होतो, असे वाटते येथे कणकणमध्ये बापूंचा वास आहे आणि विश्वाला मार्ग दाखवत आहे. येथील स्वच्छता अनुकरणीय आहे. व्यवस्था व व्यवस्थापकांचा सहयोग व व्यवहार उत्तम दिसून आला. आश्रम राष्ट्रीय धरोवर असून विश्वाला दिशा देवून सध्याची परिस्थिती सुधारण्याचे कार्य येथून होत आहे, असा अभिप्राय डॉ. ज्ञान यांनी दिला.
दिपांकर ज्ञान यांची बापुकूटीला भेट
By admin | Updated: February 26, 2017 00:54 IST