स्टेडियमचा वापर सुरूच : १ मे पासून करणार होते बंद
गोंदिया : शहरातील एकमेव इंदिरा गांधी स्टेडिमय विविध कार्र्यक्रमांसाठी उपलब्ध करविण्यात येते. यामुळे खेळाडूंना खेळण्यासाठी जागा राहत नाही व त्यांना त्रास होतो. ‘लोकमत’ ने ही बाब बातमीच्या माध्यमातून मांडली होती. या समस्येवर तोडगा म्हणून १ मे पासून स्टेडियम फक्त खेळण्यासाठीच राहणार असून कार्यक्रमांना नाकारण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी सांगीतले होते. असे असताना मात्र १४ मे रोजी एक विवाह सोहळा स्टेडिमयमध्ये पार पडला. पालिकेने जागा उपलब्ध करवून दिल्याशिवाय कुणी एवढा मोठा कार्यक्रम घेणे शक्य नाही. यावरून मुख्याधिकार्यांना आपल्याच बोलण्याचा विसर पडल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच पालिकेच्या कथणी व करणीत फरक असल्याचे बोलले जात आहे. शहरात क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा व येथील खेळाडूंना खेळण्यासाठी जागा असावी या उद्देशातून इंदिरा गांधी स्टेडियम बनविण्यात आले आहे. शहराच्या मध्यभागी असल्याने सर्वच भागातील खेळाडू येथे खेळण्यासाठी येतात. नगर परिषदेच्या अधिकार क्षेत्रात स्टेडियम येत असून येथे विविध कार्यक्रमांसाठीही नगर परिषद स्टेडियम उपलब्ध करवून देत आहे. विवाह सोहळे, प्रदर्शनी, मेळे, मंत्र्यांच्या सभा यासारखे कार्यक्रम या स्टेडिमय मध्येच घेतले जातात. यासाठी मोठ मोठाले मंडप लावण्यात येत असल्याने मात्र खेळाडूंना खेळण्यासाठी जागाच राहत नाही. स्टेडियममध्ये फुटबॉल, क्रिकेट, हॉकी सह अन्य असोसिएशनचे खेळाडू येऊन आपला सराव करतात. मात्र कार्यक्रमांमुळे त्यांना त्रास होतो. याबाबत नगर परिषदेला कित्येकदा कळवून व निवेदन देऊन स्टेडियम कार्यक्रमांसाठी उपलब्ध न करविण्याची मागणी करण्यात आली. मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केले व हा प्रकार अद्यापही सुरूच आहे. लोकमतने हा विषय हाताळला व बातमीच्या माध्यमातून खेळाडूंच्या भावना नगर परिषद प्रशासन व शहरवासीयांपुढे मांडल्या. त्यावर मुख्याधिकारी मोरे यांनी १ मे पासून इंदिरा गांधी स्टेडियम अन्य कार्यक्रमांसाठी उपलब्ध करवून दिले जाणार नसल्याचे सांगीतले होते. असे असतानाही मात्र १४ मे रोजी याच इंदिरा गांधी स्टेडियममध्ये एक विवाह सोहळा पार पडला. आयोजकांनी नगर परिषदेच्या परवानगी शिवाय येथे एवढा मोठा कार्यक्रम घेणे पचणारी बाब नाही. यामुळे नगर परिषदेच्या परवानगीनेच हा सोहळा येथे घेण्यात आल्याचे स्पष्ट होते. यावरून नगर परिषद मुख्याधिकारी मोरे यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडल्याचे यातून दिसून येते. तर नगर परिषद बोलते काही व करते काही हा प्रकार सुद्धा दिसून येतो. अशात नगर परिषदेने आपली भुमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)