नवेगावबांध : स्थानिक ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयात डायरियाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथे डायरियाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. नवेगावबांध येथे मागील तीन दिवसांपासून हागवण व उलटी होत असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. यामध्ये बालक, प्रौढ व वयस्क व्यक्ंितचा देखील समावेश आहे. तीन-चार दिवसांपासून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात देखील अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. सांडपाण्याचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण, नाल्यांची सफाई, कचरा व्यवस्थापन आदी कामे योग्यप्रकारे गावात होत नसल्याकारणाने रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. याकडे ग्रामपंचायतने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाने देखील या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन वेळीच उपचारात्मक कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी उकळून थंड केलेले पाणी प्यावे, ताजे अन्न ग्रहण करावे, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन साचलेल्या पाण्यावर रॉकेल टाकावे, विहिरीत क्लोरीन पावडरचा वापर करावा असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.तृप्ती पचभैय्ये यांनी कळविले आहे. (वार्ताहर)
नवेगावबांध येथे डायरियाची लागण
By admin | Updated: February 13, 2015 01:09 IST