इसापूर : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १९४५ घरकुल लाभार्थी दाखल्याअभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या १०० दिवसाच्या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नवीन घरकुले मंजूर करणे व अपूर्ण घरकुल पूर्ण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत पंचायत समिती अर्जुनी-मोरगावने संपूर्ण तालुक्यात १९४५ घरकुल लाभार्थ्यांनी प्रस्ताव जमा केले होते. ते प्रस्ताव सहायक आयुक्त समाज कल्याण गोंदिया यांच्याकडे सादर करण्यात आले. परंतु या प्रस्तावांमध्ये तलाठी यांच्याकडील अल्पभूधारक व भूमिहीनचे दाखले नसल्यामुळे सर्व प्रस्ताव पंचायत समितीला परत पाठविले आहे. त्यामध्ये अल्पभूधारक व भूमिहीनचे दाखले जोडून घरकुल मान्यतेकरिता प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तलाठी हे लाभार्थ्यांना अल्पभूधारक व भूमिहीनचे दाखले देत नसल्यामुळे तालुक्यातील घरकुले मंजूर करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. लाभार्थ्याने स्वयंघोषणा पत्र द्यावे असे सुचविण्यात आले आहे. मात्र लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र चालत नाही त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.