गोरेगाव : तालुक्यातील कटंगी व कलपाथरी हे दोन मध्यम प्रकल्प शासनाला उत्पन्न मिळण्याचे साधन झाले. मात्र १५ वर्षांपूर्वी सदर प्रकल्पात गेलेल्या जमिनीचे प्रकल्पग्रस्त आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आपला हक्क व मालकीच्या जमिनीच्या मोबदल्यासाठी शासनाला भीक मागण्यासारखी दयनीय अवस्था या प्रकल्पांची झालेली आहे. येणाऱ्या निवडणुकीपूर्वी तरी पुनर्वसन अनुदान मिळणार काय, असा सवाल या प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला आहे.पुनर्वसन अनुदान हा मुद्दा केवळ प्रकल्पग्रस्त मतदारांना रिझविण्यासाठी मिळाल्याची चर्चा परिसरात होत आहे. प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे कार्यसुद्धा कंत्राटदारांचे काम पूर्ण होईपर्यंतच दिसून आले. या समितीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त आजही उपाशी असले तरी नेतृत्व करणारे मात्र तुपाशी राहिले.दोन्ही प्रकल्पाच्या हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांना मोबदला व भूभाड्यासाठी त्राही-त्राही अशी गत झाली आहे. पुनर्वसन अनुदान, प्रमाणपत्र, पाल्यांना नोकरी यासाठी १५ वर्षे लोटूनही सत्ताधारी व विरोधी नेत्यांना न्याय देता आले नाही. मात्र येणाऱ्या निवडणुकीत प्रकल्पग्रस्तांचे हजारो मत आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मात्र नेतेमंडळींना पुनर्वसन अनुदान हा ठोस मुद्दा मिळाल्याचे दिसून येते. आज जरी मुद्दा जोमाने शासनदरबारी ठेवला तर पुनर्वसन अनुदान मिळण्यासाठी आठवडा लागणार नाही. पण आतातरी पुनर्वसन अनुदान मिळणार काय? हे कोडेच आहे. आतापर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी थोडेफार झटणारे एक-दोनच नेते असल्याचे प्रकल्पग्रस्त आवर्जुन सांगत आहेत. मात्र इतरांसाठी फक्त हा प्रचार मुद्दाच दिसून येतो.
पुनर्वसन अनुदानासाठी प्रकल्पग्रस्तांची मागणी
By admin | Updated: July 12, 2014 01:26 IST