बोंडगावदेवी : गावातील रानबोडी तलावातील पाण्यामुळे संग्रहीत असलेले मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले. दररोज मोठ्या प्रमाणात मासे मरत आहेत. तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडल्याने दुर्गंधी सुटली असून, मत्स्यपालन करणाऱ्यांचे नुकसान होत आहे.
एकाएकी मासे मरणासन्न होत असल्याने लाखो रुपयांची झळ संस्थेला पोहोचत आहे. संबंधितानी नुकसान भरपाई देण्याची मागणी संस्थेचे अध्यक्ष यशवंत मेश्राम यांनी केली. येथील सरोज मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्यावतीने गावातील रानबोडी तलावात दोन लाखांची मत्स्य बीजाई टाकण्यात आली होती. कतला, रोहु, मिरगल, शिपनस या जातीचे मासे तलावात आहेत. आजघडीला अर्धा किलोपासून ते एक किलो वजनाचे मासे तलावात आहेत. गावातील बहुसंख्येने असलेला भोई समाज मासेमारी करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. संस्थेच्यावतीने तलावात मत्स्य उत्पादन करून सभासद भोई समाज बांधवांना रोजी उपलब्ध करून दिल्या जात आहे. एकाएकी मासे मरण्याच्या प्रकाराने भोई बांधव आर्थिक संकटात सापडला आहे. मासेमारी करून आपला घरसंसार चालविणाऱ्या भोई समाजाला संबंधितांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
लाखो रुपयांचेे नुकसान
रानबोडी तलावातील एकाएकी मासे मरण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू झाला. औषधाची फवारणीसुद्धा करण्यात आली. मासे मरत असल्याने संस्थेला लाखो रुपयांची झळ पोहोचली. समाज बांधवांना रोजगारापासून मुकावे लागत आहे. दरदिवशी मासे मरून दोन लाखांची नुकसान झाले. संबंधिताना नुकसान भरपाई द्यावी.
यशवंत मेश्राम, अध्यक्ष, सरोज मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था बोंडगावदेवी.