हजारो रुग्ण : आरोग्य यंत्रणा पडत आहे तोकडी गोंदिया : जिल्ह्यातील अनेक भागात सध्या तापाचे हजारो रुग्ण दररोज रुग्णालयात दाखल होत आहेत. आधीच नागरिकांमध्ये डेंग्यू-मलेरियाची दहशत निर्माण झाल्यामुळे रुग्ण कोणतीही ‘रिस्क’ न घेता रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रुग्णालयांचा बाह्यरुग्ण आणि आंतररूग्ण विभाग रुग्णांनी भरून गेल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. या रुग्णांवर औषधोपचार करताना वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागत आहे. आमगाव : तालुक्यात डेंग्यूने पीडित असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये या आजाराच्या भीतीने दहशत पसरली आहे. आरोग्य विभागाने नागरिकांमध्ये जागृतीसाठी स्वच्छता जागरण मोहिम सुरू केली असून रुग्णांना प्रथम उपचाराची माहिती दिली जात आहे. तालुक्यात मागील तीन महिन्यांपासून तापाची साथ पसरल्याने योग्य उपचाराअभावी काही नागरिकांना मृत्युने कवटाळले आहे. नागरी वसाहतींमध्ये स्वच्छता मोहिम थांबल्याने पसरलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यु तापाची साथ पसरली आहे. नागरिकांना शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, परंतु काही रुग्ण ताप आल्यावर आधी गावातील बोगस डॉक्टरांकडून प्रथमोपचार करीत आहे. त्यामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आमगाव तालुक्यातील अंजोरा, वळद, सोनेखारी, जवरी या गावांमध्ये तापाच्या साथीने रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गावात मलेरियाचे रुग्ण अधिक आढळले आहेत. डेंग्युच्या संशयीत रुग्णांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. गाववस्त्यांमधील पसरलेल्या घाणीमुळे व साचलेले पाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छता राखण्यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतने स्वच्छता मोहिमेला गती देण्याची गरज आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी औषधांची फवारणी आवश्यक आहे. परंतु प्रशासकीय स्तरावर पुढाकार घेण्यास ग्रामपंचायत मागे पडत आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना तत्परतेने उपचारासाठी पथक तयार केले आहे. तसेच अस्वच्छतेमुळे डासांची होणारी वाढ नष्ट करण्यासाठी स्वच्छता जागरण मोहिम सुरू केली आहे. तापाची साथ पसरू नये यासाठी नागरिकांना उपाय सूचविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. गोरेगाव : गोरेगाव तालुक्यात तापाने थैमान घातले असून स्थानिक ग्रामीण रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे जानाटोला, घोटी, भंडगा, मुंडीपार, पिंडकेपार, गराडा, आसलपाणी, झांजीया, कटंगी, गिधाडी या गावातील रुग्ण येतात. सध्या वातावरण बदलामुळे तापाचे प्रमाण वाढले आहे. नागरिक विविध आजाराने ग्रस्त आहेत. यात ९० टक्के रुग्ण तापाने ग्रस्त आहेत. बुधवारी ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे ४०० ते ५०० रुग्ण उपचारासाठी उपस्थित होते. अनेकांना सर्दी, खोकला आणि ताप या तीन तक्रारी अधिक प्रमाण असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पि.के.पटले यानी सांगीतले. ४०० ते ५०० रुग्णांना सेवा देण्यासाठी डॉ.सचिन पाटील, डॉ. पि.के.पटले व त्यांची यंत्रणा कामाला लागली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने साफसफाई न केल्यामुळे डासांची संख्या वाढली. सोबतच दूषित पाणी पुरवठा, वातावरणात उष्णतेचे वाढलेले प्रमाण या सर्व बाबीमुळे अनेक गावे रोगाच्या विळख्यात सापडली आहेत. नवेगावबांध : येथे मागील दिड महिन्यापासून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने गावात साथीचे रोग पसरत आहेत. यासाठी प्रशासनाने गावात फवारणी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस आला नाही. त्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून आहे. रस्त्याच्या बाजूला बनविलेल्या नाल्यांमधून पूर्णपणे पाणी वाहून जात नाही. गावात असलेल्या शेणखताच्या खाणीमध्ये देखील पाणी साचून राहत असते. तसेच सांडपाण्याचा देखील पूर्णपणे निचरा होत नाही. या सर्व बाबी मच्छरांची पैदास होण्याला पोषक ठरत असल्याकारणाने गावात मच्छरांची संख्या वाढलेली आहे. त्यामुये लहान बालकांपासून तर वृध्दांपर्यंत सगळेच मच्छरांमुळे त्रस्त आहेत. सध्या ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आदी आजारांचे रुग्ण वाढल्यामुळे शासकीय तसेच खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. मच्छरांवर प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास डेंगु, मलेरिया, विषमज्वर, कावीळ, गॅस्ट्रो आदि साथीचे रोग पसरण्याची भिती नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्न करीत नाही आणि रोगाची लागण झाल्यावर धावाधाव व जुळवाजुळव प्रशासनाचे वतीने करण्यात येते. स्वत:ची कामे सोडून दवाखाने व डॉक्टरकडे त्यांना चकरा माराव्या लागतात. यामध्ये वेळ व पैसाही खर्च होत आहे. यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करून सामान्य जनतेला रोगमुक्त करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी करण्यात येत आहे. केशोरी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी आणि परिसरात बदलत्या वातावरणामुळे डासांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढला असून आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अजूनही डासनाशक फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. गावात प्रत्येक घरी तापाचा रुग्ण दृष्टीत पडत आहे. त्वरीत जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष देऊन केशोरी आणि परिसरात डासनाशक औषधीची फवारणी करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
डेंग्यू-मलेरियाची दहशत
By admin | Updated: September 2, 2014 23:51 IST