बिजेपार : सालेकसा तालुक्यातील लोहारा (तिरखेडी ) येथे डेंग्यू रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे येथील डेंग्यूचे रुग्ण गोंदियाच्या खासगी रुग्णालयात महागडा उपचार घेत आहेत. लोहारा गावाच्या शेजारी असलेल्या कोटरा या गावात डेंग्यू व मलेरीयाने मागील दोन महिन्या अगोदर थैमान घातले होते. कोटरा येथील ७०० पेक्षा अधिक रुग्ण आजारी पडले होते. संपुर्ण कोटरा गावच डेंग्यूने ग्रासला होता. त्यावर नियत्रंण मिळविण्यासाठी बिजेपार आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. उज्ज्वल देवकाते, डॉ.डी.डी. रायपुरे, डॉ. प्रियंका कंगाले व त्यांच्या संपुर्ण चमूने दिवसरात्र तळ टोकून रुग्णांचे आरोग्य सुधरले. संपूर्ण जिल्हा डेंग्यूच्या उद्रेकाने हादरला. याचे नेमके कारण शोधण्यासाठी पुणे येथील एक प्रयोग शाळा तज्ज्ञांची चमू भेट देऊन गेली. त्यांनी सोबत येथील रूग्णांच्या रक्ताचे नमुने नेले. येथील कही रूग्णांचा गोंदियाच्या केटीएस रुग्णालयामध्ये तर काहींचा खाजगी रुग्णालयात उपचार करुन डेंग्यूच्या रुग्णांची परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. कोटरा या गावाला लागूनच असलेल्या लोहारा येथे सध्या सातत्याने डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होत आहे. त्यात रोशनलाप राणे (५०), रवींद्र लामकासे (२७), दीपा तुरकर (२१), तिलकचंद लामकासे (४०), अशा चार रुग्णांचा उपचार गोंदियाच्या बजाज सेंट्रल हॉस्पिटल येथे सुरु आहे. त्यांना डेंग्यू आजार झाल्याचे रक्त तपासणीत निष्पन्न झाले.डेंग्यूचा आजार झाला किंवा नाही यासाठी एक रक्ताची तपासणी करावी लागते. ती तपासणी करण्यासाठी रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लगते. त्या तपासणीसाठी एक हजार रुपये रूग्णांना मोजावे लागतात. ही तपासणी करण्याची सोय शासकीय आरोग्य केंद्रात नाही.त्यामुळे ही तपासणी करण्याची सोय सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात त्वरित करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. लोहारा येथे डेंग्यूचा उद्रेक पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार येण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते युवराज कटरे यांनी केली आहे. (वार्ताहर)
लोहारा गावात डेंग्यूची लागण
By admin | Updated: September 29, 2014 23:08 IST