गोंदिया : रस्त्यावर गट्टू लावण्यासाठी कार्यादेश देण्यात यावा, यावरून नगरसेविकेच्या पतीने नगर परिषद अभियंत्यांना बघून घेण्याची धमकी देत त्यांच्या दालनातील खुर्च्यांची फेकाफेकी केली. सोमवारी दुपारी १.३० च्यादरम्यान घडलेल्या या प्रकरणात अभियंत्यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे.
सविस्त वृत्त असे की, शहरातील रेलटोली परिसरातील हॉटेल पॅसिफिकच्या बाजूच्या रस्त्याचे सिमेंटीकरणाचे काम झाले आहे. आता त्या रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक लावायचे असून, यासाठी प्रभाग क्रमांक-५ च्या नगरसेविका रत्नमाला साहू यांचे पती ऋषिकांत साहू (४२, रेलटोली) नगर परिषद अभियंता डॉली मदान (२८, रा. खापर्डे कॉलनी) यांच्या दालनात दुपारी १.३० च्यादरम्यान गेले. याप्रसंगी आपल्या दालनात काम करीत असलेल्या मदान यांनी साहू यांना बसण्यास सांगितले. बसल्यानंतर साहू यांनी रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक लावण्यासाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यास सांगितले. यावर मदान यांनी त्यांना कार्यादेशच्या प्रक्रियेत वेळ लागणार असल्याने कार्यादेश देता येणार नाही, असे सांगितले, तर साहू यांनी कार्यादेश देत नसल्यास कंत्राटदाराला काम करण्यास सांगा, असे म्हटले. यावर मदान यांनी कंत्राटदाराला काम करण्यास सांगता येणार नाही; मात्र कार्यादेश लवकरात लवकर तयार करण्याची प्रक्रिया करून देणार, असे सांगितले. यावर साहू यांनी उठून तेथील खुर्च्या फेकल्या व मदान यांना बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी मदान यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली असून, भादंवी कलम १८६.१८९ अंतर्गत प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
------------------------------
आज कामबंद आंदोलन
नगर परिषद अभियंता मदान यांच्यासोबत नगरसेविकेचे पती साहू यांनी केलेल्या या व्यवहारानंतर नगर परिषदेत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांत चांगलाच रोष व्याप्त आहे. यावर नगर परिषद अधिकारी-कर्मचारी मंगळवारी (दि. २) कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही कित्येकदा नगर परिषद सदस्यांकडून नगर परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली आहे.