गोंदिया : अवघ्या जगाला हादरविणाऱ्या कोरोनावर लस तयार झाली असून, आज, शनिवारपासून अवघ्या देशात लसीकरणाला सुरुवात होत आहे. यामुळे आता कोरोनाला घाबरण्याची काहीच गरज नाही, असे काहीसे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून बेफिकीरपणे वागणे सुरू आहे. मात्र कोरोनानेही सर्व भ्रम बाजूला सारून देत तरण्या जवानांनाही गिळण्याचे काम केले असल्याने ‘जिल्हावासीयांनो, आताही जरा जपूनच,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी भारताने आघाडी घेत एक नव्हे, तर दोन लसी तयार केल्या आहेत. या लसींना मंजुरी देण्यात आली असून, आज, शनिवारपासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. यामुळे आता सर्वांच्या नजरा लसीकडे लागल्या आहेत. आम्हाला लस कधी मिळणार, अशी विचारणा सर्वसामान्यांकडून केली जात असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच, या वर्षात कोरोना समूळ नष्ट होणार असे वाटत असतानाच जाता-जाता कोरोना जिल्हावासीयांना हादरे देत असल्याचे दिसत आहे. कोरोनाने शुक्रवारी येथील तरुण उपजिल्हाधिकाऱ्यांनाही सोडले नाही. लस आली असून जिल्ह्यातून कोरोनाच्या घटत असलेल्या आकडेवारीवरून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे बोलले जात असून तसे दिसत आहे. मात्र कोरोनामुळे मृतांची संख्याही वाढत असल्याचे दिसत असून याकडे दुर्लक्ष करणेसुद्धा तेवढेच धोक्याचे ठरत आहे. यामुळेच ‘जिल्हावासीयांनो, आताही जपूनच,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
-----------------------------
आतापर्यंत १८१ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १८१ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात गोंदिया तालुका आघाडीवर असून सर्वाधिक १०१ रुग्णांचा जीव गेला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तेवढीच बेफिकिरी गोंदिया शहरातच पाहावयास मिळत आहे. मात्र कोरोनापासून बसत असलेल्या हादऱ्यांनंतर जिल्हावासीयांनी हा आजार गांभीर्याने घेण्याची गरज आहे.