काेरोनावरील दोन लसींना मंजुरी मिळून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७०० फ्रंटलाईन योद्ध्यांना कोविड लसीकरण करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने खालावत असल्याने जिल्हा लवकरच कोरोनामुक्त हाेण्याची शक्यता आहे. बुधवारी जिल्ह्यात २१ बाधितांनी कोरोनावर मात केली तर १३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक पाच रुग्ण सालेकसा तालुक्यातील आहेत. गोंदिया ४, आमगाव ३, सडक अर्जुनी तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ६०,४०५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ५७,५११ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात असून आतापर्यंत ६३,५६७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५७,५११ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४,०६६ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १३,७२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १६१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर २५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
कोरोनाला लागली उतरती कळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:27 IST